ताज्या बातम्या

लावणी कलावंत महासंघाच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त २०० विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

ठाणे, दि. ३१ : लावणी कलावंत महासंघाच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त महासंघ आणि विविध समाजसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील नवजीवन प्राथमिक विद्यालय येथे २०० शाळकरी विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाला बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा तथा सिनेअभिनेत्री निलम शिर्के सामंत, समाजसेवक मोहन पवार, लावणी कलावंत महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष संतोष लिंबोरे, नवजीवन प्राथमिक विद्यालयाचे संस्थापक व मुख्याध्यापक जितेंद्र बजाज तसेच महासंघाचे पदाधिकारी, सभासद आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी लेझीमच्या गजरात उपस्थित पाहुण्यांचे उत्साहात स्वागत केले. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

प्रास्ताविकात लावणी कलावंत महासंघाच्या १२ वर्षांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीचा आढावा घेण्यात आला. मुख्याध्यापक जितेंद्र बजाज यांनी शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाची आणि शाळेच्या गरजांची माहिती दिली. यावेळी महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष संतोष लिंबोरे यांनी शाळेला भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

प्रमुख पाहुण्या निलम शिर्के सामंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण, संस्कार आणि आत्मविश्वासाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी प्राथमिक टप्प्यात ४० विद्यार्थ्यांना वही, पेन, कंपास, पाण्याच्या बाटल्या आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, सुका खाऊ, ज्यूस यांसारख्या जीवनावश्यक वस्तू आणि अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत नृत्याचा आनंद लुटला. राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निलम शिर्के सामंत, संदीप निरगुडकर, विवेक नागवेकर, शंकर पिसाळ, मोहन पवार, आम्ही मराठी पथक, सुरेश मोरे, लावणी कलावंत महासंघाचे सर्व पदाधिकारी, सभासद तसेच अनेक दानशूर व्यक्तींनी मोलाचे सहकार्य केले.

Scroll to Top