मुंबई : राज्यातील अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने प्रवेश देणाऱ्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रति विद्यार्थी पाच हजार रुपये दंड आकारण्याच्या शासनाच्या निर्णयाचा शिक्षक भारती संघटनेने तीव्र निषेध केला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रवेश देणाऱ्या संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी हा दंड तातडीने रद्द करावा, अशी मागणी संघटनेने शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी दिला आहे.
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी काढलेल्या पत्रानुसार, मागील शैक्षणिक वर्षात अकरावीला ऑफलाइन पद्धतीने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी त्यांना बारावीच्या बोर्ड परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अशा विद्यार्थ्यांना ऑफलाइन प्रवेश देणाऱ्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रति विद्यार्थी पाच हजार रुपये दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित संस्थांची चौकशी करून कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
वास्तविक, प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी आणि शिक्षण विभागाकडून वेळेत प्रवेश उपलब्ध न झाल्यामुळे अनेक संस्थांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उदात्त हेतूने अकरावी आणि बारावीमध्ये ऑफलाइन प्रवेश दिले आहेत. यामध्ये अल्पसंख्याक समाजातील अनेक शाळा व महाविद्यालयांचा समावेश आहे. तांत्रिक अडचणींमुळे संस्थांचा प्रवेश कोटा उपलब्ध न झाल्यानेही काही संस्थांना ऑफलाइन प्रवेशाचा पर्याय स्वीकारावा लागला.
अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देऊन प्रवेश देणाऱ्या संस्थांवर दंडात्मक कारवाई करणे अन्यायकारक आहे. संस्थांना दंड आकारला असला तरी त्याचा आर्थिक भार अखेरीस विद्यार्थ्यांवरच पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करून प्रति विद्यार्थी पाच हजार रुपयांचा दंड तातडीने रद्द करावा, अशी आग्रही मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या संस्थांना दंडित करण्याऐवजी त्यांच्या अडचणी समजून घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा शिक्षक भारती संघटना राज्यभर आंदोलन करेल, असा इशाराही कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिला आहे.




