प्रतिनिधी : स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 च्या अनुषंगाने ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, आयुक्त डॉ.कैलास शिंदे साहेब यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली ठिकठिकाणी विशेष स्वच्छता मोहिमांप्रमाणेच क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत.
या अनुषंगाने आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिला बचत गटांमधील (SHGs) महिलांना उपजिविका आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात एक ठिकाणी अशा 8 ठिकाणी झालेल्या या प्रशिक्षण वर्गाचा लाभ महिला बचत गटातील 385 महिलांनी घेतला.
यामध्ये केंद्रीकृत सुका कचरा प्रक्रिया केंद्र चालविणे, थ्री आर केंद्र चालविणे, ई – कचरा केंद्र चालविणे, जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करणे व पुनर्निर्मिती करणे, प्लास्टिक कच-याचा पुनर्वापर करणे, फुलांच्या निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करणे आणि सेंद्रिय खत निर्मिती व बायोगॅस प्रकल्प या विषयांवर रोजागाराभिमुख प्रशिक्षण देण्यात आले.
घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने महिला बचत गटांमधील महिलांची क्षमता बांधणी करण्यासाठी कौशल्य मल्टिक्रिएशन्स या संस्थेच्या सहकार्याने 8 ठिकाणी आयोजित या मोफत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि समाजविकास विभाग यांनी सहयोगाने केले. महिला बचत गट (SHGs) व अशासकीय संस्था (NGOs) प्रतिनिधींचा सहभाग वाढविण्यासाठी समाजविकास विभागातील समुह संघटक यांनी सहकार्य केले तसेच दुर्गा फांऊडेशन यांनीही आयोजन सहकार्य केले.
स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0 च्या अनुषंगाने स्वच्छता कार्यात योगदान देण्यासोबतच महिलांना व्यावसायिक प्रशिक्षणाची संधी देणा-या या क्षमता वर्धक उपक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला. प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
Post Views: 86