सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यामध्ये आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जाती धर्माच्या विद्यार्थी व पालकांना सातारा जिल्हा जात पडताळणी समितीच्या वतीने प्रस्ताव दाखल करून ही जात प्रमाणपत्र त्वरित किंवा दिलेल्या कालावधीत मिळत नाही. असे असताना राजकीय आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर प्रिया महेश शिंदे यांनी चार दिवसाच्या कालावधीत प्रमाणपत्र मिळवून सादर केलेला कुणबी मराठा जात प्रमाणपत्र रद्द करावा. राजकीय दबाव पोटी कोणत्याही निर्णय घेऊ नये. अन्यथा जन आंदोलन उभारण्यात येईल. असा इशारा सातारा येथील राजकीय आरक्षण अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष साळुंखे, प्रवीण धसके आणि जयदीपकुमार मगर यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत खटाव गट क्रमांक १८ मधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रिया महेश शिंदे यांनी सर्वसाधारण गटातून मराठा म्हणूनच निवडणूक लढवून मतदारांना जाहीर पणाने मत मागितले होते. सत्ताधारी भाजप पक्षाचा त्यांना पाठिंबा असल्यामुळे त्यांनी नामनिर्देशन पत्रात मराठा या जातीचा उल्लेख केला होता. त्यामुळे त्यांचा विजय झाल्यानंतर त्यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पद इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव असल्याने सत्ताधारी पक्षाच्या पाठिंब्यावर चार दिवसात जातीचा कुणबी- मराठा असा दाखला काढून दाखवला आहे. सातारा जिल्ह्यात मूळ असलेल्या कुणबी मराठा व मागासवर्गीय महिलांवर अन्याय करून घुसखोरी केलेले आहे. मुळातच स्वतःला ९६ कुळी मराठा जातीचा अभिमान असणाऱ्या डॉ. प्रिया महेश शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पद इतर मागासवर्गीयांसाठी राखीव झाल्यानंतर स्वतःची हिंदू मराठा ही जात बदलून कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र अक्षरशा सत्ताधारींच्या माध्यमातून मिळवून दाखवले आहे. वास्तविक पाहता त्यांचे पती हे शिवसेनेचे आमदार व भाजपचे कट्टर समर्थक महेश शिंदे हे मराठा आहेत तर डॉक्टर शिंदे यांनी खोट्या कागदपत्राच्या द्वारे सादर केलेल्या जातीच्या दाखल्याप्रमाणे कुणबी मराठा आहेत. त्यामुळे मायबाप महायुतीच्या सरकारने आंतरजातीय विवाह केल्याबद्दल त्यांचा पुरस्कार करावा. त्यांना शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून संपूर्ण सहकार्य करावे. अशी उपरोधात्मक मागणी यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना श्री साळुंखे श्री दस के व श्री मगर यांनी केली आहे. डॉ. प्रिया महेश शिंदे यांनी १६ मार्च २०२६ रोजी सातारा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे कुणबी- मराठा जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे १८ मार्च रोजी विविध महसुली अभिलेख, प्रतिज्ञापत्र, वंशावळी आणि मोडीलिपीतील नोंदीचा संदर्भ घेऊन कागदपत्र सादर केले त्यानंतर २० मार्च रोजी सकाळी नऊ वाजून त्रेपन्न वाजता त्यांना कुणबी- मराठा प्रमाणपत्र देण्यात आले. सातारा जिल्ह्यात जात पडताळणी समितीकडून एवढी तत्परता कधीही शैक्षणिक सवलतीसाठी अर्ज करणाऱ्या कुणबी- मराठा समाजाला लाभली नाही. अनेक बांधवांना सातारा जिल्ह्यात कुणबी- मराठा जात प्रमाणपत्रासाठी झगडावे लागत आहे. परंतु, भाजपची सत्ता असल्यामुळे एकाधिकारीशाहीने काही समाज कल्याण व महसूल खात्यातील अधिकारी सुद्धा बदलीच्या भीतीने काम करत असल्याचे दिसून आले असाही आरोप करण्यात आला आहे डॉ. प्रिया महेश शिंदे यांच्या सादर केलेल्या १८ मार्च रोजी दोन आणि २५ जून रोजी तिसरी वंशावळ सादर केली होती. हाच चर्चेचा विषय झालेले आहे .पहिल्या वंशावळीमध्ये नसलेले नाव दुसऱ्या वंशावळीत घातली आहे. तिसऱ्या वंशावळीत सुद्धा भलतेच नाव आहे. नामसाधर्माचा आधार घेऊन कुणबी- मराठा जातीसाठी लाभ घेतला आहे का? याची तपासणी व्हावी. अशी त्यांनी मागणी केली आहे. अभिलेखित जुन्या मोडी लिपीतील अभिलेखा बाबत अभ्यासकांनी तपासणी केली असता अनेक तफावती आढळून आलेले आहेत. वंशावळीमधील जन्म मृत्यू नोंदणीसाठी ३० मार्चला अर्ज केले आहे. तर त्यापूर्वी दहा दिवस अगोदर २० मार्च रोजी जात प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर त्याच दिवशी जात पडताळणी समितीकडे ऑनलाईन अर्ज केल्याचे दिसून आलेले आहे. या सर्व बाबींची समितीने वस्तूनिष्ठ तपासणी करावी. या जात प्रमाणपत्राबाबत आक्षेप नोंदविण्यात आले आहे मुळातच या जात प्रमाणपत्र बाबत आवश्यक असणाऱ्या कागदपत्राच्या नोंदी खटाव येथील असताना सातारा उपविभाग अधिकारी प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे अधिकार कोणत्या अधिकाराखाली वापरले आहेत? याचाही खुलासा होणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे सध्या सर्व क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे सर्वसामान्य सातारकरांचा महसूल खात्यावरील विश्वास उडालेले आहे राजकीय हस्तक्षेप आणि जर या जात प्रमाणपत्र बाबत निर्णय लादल्यास सातारा जिल्हा जात पडताळणी समितीच्या विरोधात जन आंदोलन उभारण्यासाठी सर्व जाती धर्मातील पालक व विद्यार्थी सहभागी होतील असे स्पष्ट केले आहे. या जात प्रमाणपत्राबाबत सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून जात प्रमाण पडताळणी समितीने सातारा जिल्ह्यामध्ये योग्य व वस्तुनिष्ठ कागदपत्र सादर करणाऱ्या कुणबी मराठा विद्यार्थी व पालकांना तातडीने कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देऊन त्यांना इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लाभ लवकर मिळावा. यासाठी प्रयत्न करावा. राजकीय दबावापोटी काम करू नये. असेही शेवटी स्पष्ट करण्यात आले आहे. …………………………….. फोटो- सातारा जि. प. अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे यांच्या कुणबी मराठा जात प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी करताना मान्यवर (छाया- अजित जगताप, सातारा)




