मुंबई : प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशनच्या नृतनाट्य प्रोडक्शन्स आयोजित ‘विठुरंग’ अत्यंत दिव्य, भक्तिरसपूर्ण आणि आध्यात्मिक कार्यक्रम अटल स्मृती उद्यान, बोरिवली येथे मोठ्या दिमाखात पार पडला.
प्रज्ञावर्धिनी फाउंडेशनचे सर्व विश्वस्त एड. रुपाली ठाकूर, सौ वैशाली भिडे बर्वे, श्री महादेव गोविंद रानडे आणि नृतनाट्य प्रोडक्शन्सच्या संचालिका वैष्णवी बर्वे, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि या कार्यक्रमास सहकार्य करणारे सर्व प्रायोजक (गिरगाव कट्टा, एलिट्स कॅपिटल, लोकमान्य मल्टीपर्पज कॉ-ऑप सोसायटी, ग्रंथ तुमच्या दारी, पीएमसी, सौ रिद्धी खुरसंगे, सौ सोनाली पाटील) यांनी अत्यंत निस्वार्थ, प्रामाणिक आणि समर्पित भावनेने सहकार्य केले.
कार्यक्रमात गायन करणारे सौ. वैशाली भिडे बर्वे, कु. सिद्धांत पाटकर आणि कु. स्वरा डबीर या कलाकारांनी आपल्या अप्रतिम गायनाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमातील प्रत्येक भक्तिगीत हे मनाला स्पर्शून जाणारे होते. प्रत्येक गायक-गायिकेने केवळ संगीत सादर केले नाही, तर आपल्या भक्तिभावातून श्री पांडुरंगाच्या चरणी स्वतःला अर्पण केले होते. त्यांच्या स्वरातून भक्ती, प्रेम आणि समर्पण यांचे दर्शन घडत होते. प्रत्येक गीत ऐकताना मन नकळत विठ्ठलनामात तल्लीन होत गेले.
अभंगावर *कथ्थक नृत्य (आनर्त कथ्थकच्या सिद्धी भोंगळे कार्लेकर आणि त्यांच्या शिष्या), ओडिसी नृत्य (मिताली वऱ्हाडकर आणि त्यांच्या शिष्या) तसेच लोक नृत्य* (अनन्या सुखटणकर आणि टीम) सादर करणे ही एक अद्वितीय आणि अनोखी संकल्पना होती. *कथ्थक आणि ओडिसी यांचे फ्युजन नृत्य* सादरीकरण केवळ शानदार होते, त्याचप्रमाणे विठ्ठल रखुमाईची अनुभूती आणि गुरु शिष्या परंपरा अभंगातून सर्व शिष्यांनी उत्कृष्टरित्या सादर केली. प्रत्येक तालामध्ये भक्तीचे दर्शन घडत होते. नृत्य म्हणजे केवळ कला नसून ईश्वरभक्ती व्यक्त करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे, याची सुंदर अनुभूती त्या सादरीकरणातून मिळाली.
*कार्यक्रमाचे निवेदन करणारे श्री चंद्रशेखर अभ्यंकर* यांचे निवेदन अत्यंत प्रभावी, रसाळ, अभ्यासपूर्ण आणि श्रवणीय होते. त्यांच्या ओघवत्या शैलीमुळे कार्यक्रमातील प्रत्येक सादरीकरण अधिक अर्थपूर्ण आणि भावपूर्ण झाले. त्यांच्या निवेदनात भक्ती, संस्कृती, विनम्रता आणि अभ्यास यांचा सुंदर मिलाफ दिसून आला.
कार्यक्रमस्थळी प्रवेश करताच कपाळावर लावण्यात आलेला चंदनाचा टिळा मनाला विलक्षण शांती, पावित्र्य आणि भक्तीची अनुभूती देऊन गेला. त्या क्षणापासून संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. सभागृहातील प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर समाधान, श्रद्धा आणि भक्तिभाव स्पष्टपणे जाणवत होता. संपूर्ण कार्यक्रमात श्री पांडुरंगाच्या नामस्मरणाचा, भक्तीचा आणि आध्यात्मिक आनंदाचा अविरत प्रवाह अनुभवायला मिळाला. अशा कार्यक्रमामुळे मनातील सर्व चिंता, ताण आणि अहंकार क्षणभरासाठी नाहीसे होऊन मन परमेश्वराच्या चरणी पूर्णपणे लीन झाले.
प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि नृतनाट्य प्रोडक्शन्सच्या टीमने संपूर्ण कार्यक्रमाचे केलेले सूक्ष्म नियोजन, शिस्तबद्ध आयोजन, प्रत्येक पाहुण्याची आत्मीयतेने घेतलेली काळजी, प्रत्येक बाबतीतील बारकाई आणि त्यांचा अथक उत्साह अत्यंत वाखाणण्याजोगा होता. देवरुख, सावंतवाडी, माणगाव, पनवेल आणि पुणे यांसारख्या दूरवरच्या ठिकाणांहूनही प्रेक्षक या विठुरंग कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सदानंद भागवत, अध्यक्ष देवरुख शिक्षण संस्था यांचे मनोगत अत्यंत हृदयस्पर्शी होते. त्यांच्या प्रत्येक शब्दात अनुभव, जीवनमूल्ये, अध्यात्म आणि समाजकार्याची जाणीव होती. त्यांचे विचार प्रत्येकाच्या मनाला प्रेरणा देणारे आणि अंतर्मुख करणारे होते.
‘विठुरंग’ ह्या कार्यक्रमाची सांगता सौ वैशाली भिडे बर्वे ह्यांचा सुरेल पसायदानाने झाली.
आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आणि तणावपूर्ण जीवनात अशा प्रकारचे आध्यात्मिक कार्यक्रम समाजाला नवी दिशा देतात. तरुण पिढीला भारतीय संस्कृती, संतपरंपरा, नामस्मरण आणि भक्ती यांचे महत्त्व समजावून सांगण्याचे हे कार्य अत्यंत मोलाचे आहे. समाजात प्रेम, बंधुभाव, सेवा, संस्कार आणि अध्यात्माची ज्योत सतत प्रज्वलित ठेवण्याचे महान कार्य प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि नृतनाट्य प्रोडक्शन्स ह्या दोन्ही संस्था सातत्याने करीत आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
काही क्षण असे वाटले की आपण पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणीच उभे आहोत.




