मुंबई, दि. २४ जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागातर्फे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अभियानाच्या पहिल्या सहा दिवसांत राज्यातील ४ लाख ३५ हजार २०९ नागरिकांनी विविध महसुली सेवा व शासकीय योजनांचा लाभ घेतला असून ३ हजार ४३६ महिलांच्या नावाची शेतकरी म्हणून नोंद करण्यात आली आहे.
महिलांना जमिनीवरील हक्क मिळवून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत नागपूर विभागात सर्वाधिक १,२१९ महिला शेतकरी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यापैकी गोंदिया जिल्ह्यात १,०६७, गडचिरोलीमध्ये ७५, भंडारा येथे ३९ आणि चंद्रपूर येथे ३८ महिलांना शेतकरी दर्जा प्रदान करण्यात आला.
राज्यभर २२ जुलैपासून सुरू झालेल्या या अभियानात नागरिकांना १५ प्रकारच्या महसुली सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. गावठाणातील नागरिकांना ‘स्वामित्व सनद’ देण्याच्या उपक्रमात नागपूरमध्ये ४२६, अमरावतीत ३६८, अकोल्यात २९४ आणि गोंदियात १५३ नागरिकांना सनदांचे वितरण करण्यात आले.
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यात २,७९७ पाणंद रस्त्यांवरील वाद मिटवून शेतकऱ्यांसाठी रस्ते खुले करण्यात आले. गोंदियात ४२२, नागपूरमध्ये १६५, भंडाऱ्यात १४५ आणि चंद्रपूरमध्ये ९२ पाणंद रस्ते मोकळे करण्यात आले.
घरकुल लाभार्थ्यांना मदत, शासकीय जमिनीवरील जुनी निवासी अतिक्रमणे नियमित करणे तसेच ‘जिवंत सातबारा’ मोहिमेद्वारे महसुली प्रश्न जागेवरच निकाली काढण्याचे कामही मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. सातारा जिल्ह्यात २,७३३, बुलढाणा येथे १,४६०, अमरावतीत ६६०, नागपूरमध्ये ६५२ आणि सांगलीत ५४३ शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांशी संबंधित प्रश्न सोडविण्यात आले.
जिल्हानिहाय लाभार्थ्यांच्या संख्येत बुलढाणा (१५,८४३), कोल्हापूर (१४,२८९), सातारा (१४,१८९), चंद्रपूर (१२,७०१), अमरावती (१२,०५७), गोंदिया (११,१५५), पुणे (१०,४३८) आणि अकोला (८,८६२) हे जिल्हे आघाडीवर आहेत. पुणे विभागात एकूण ६६,२०० लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला असून राज्यभरातील लाभार्थ्यांची संख्या २ लाख ३९ हजार ७४४ वर पोहोचली आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून प्रशासन थेट जनतेच्या दारी पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि वेगवान सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. राज्यातील आमदार आणि सर्व लोकप्रतिनिधींनी या अभियानाला दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार.”
हे अभियान राज्यभरात २ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल विभागाने केले आहे.




