सातारा(भीमराव धुळप) : श्री एच. बी. जंगम चॅरिटेबल ट्रस्ट, पर्वत तर्फ वाघावळे यांच्या वतीने जिल्हा परिषद आयुर्वेदिक दवाखाना, वाघावळे यांना देण्यात आलेली अत्याधुनिक ॲम्बुलन्स जिल्हा परिषद प्रशासनाने अधिकृतपणे ताब्यात घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा. राजूभैया भोसले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) डॉ. खलीपे यांनी ॲम्बुलन्सची विधिवत पूजा करून ती आरोग्य विभागाच्या सेवेत दाखल केली.
या प्रसंगी जिल्हा परिषद प्रशासनाने वाघावळे येथील आयुर्वेदिक दवाखान्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी (मेडिकल ऑफिसर) नियुक्ती, ॲम्बुलन्स चालकाची नियुक्ती, तसेच ॲम्बुलन्सचा इंधन व देखभाल (मेंटेनन्स) खर्च जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत करण्यात येईल, असे मान्य करण्यात आले.
या उपक्रमामुळे वाघावळे परिसरातील नागरिकांना तातडीच्या आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट होण्यास मोठी मदत मिळणार आहे.
यावेळी श्री महादेव जंगम गुरुजी, डॉ. चांदुगडे, अजितराव मोरे, संजय जंगम, संपत जंगम, संतोष जंगम आणि भीमराव भालेराव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.




