रत्नागिरी : सामान्य माणसांनी केलेल्या तक्रारीबाबत चौकशी करायला अधिकाऱ्यांना तीन-तीन वर्षे लागतात? असा ढिम्म कारभार खपवून घेतला जाणार नाही. चुकीची कामे करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल,” असा कडक इशारा महाराष्ट्राचे गृह(शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला.
पंचायत समिती दापोलीची आमसभा मंत्री कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तब्बल सहा तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत खेड मतदार संघाच्या जनतेच्या विविध प्रश्नांवरून राज्यमंत्री श्री कदम यांनी अधिकाऱ्यांची चांगलाच धारेवर धरत ‘क्लास’ घेतला.
या आमसभेला रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, पंचायत समिती सभापती उन्मेष राजे, उपसभापती नम्रता तोडणकर, नगराध्यक्ष कृपा घाग, प्रांताधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांच्यासह पं स सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आमसभेला सार्वजनिक बांधकाम आणि महावितरणवर ताशेरे ओढण्यात आले.
रस्त्यांवरील खड्डे निकषानुसारच भरले पाहिजेत, असे स्पष्ट करत राज्यमंत्री म्हणाले, “मागील वर्षात झालेल्या सर्व खड्डे भरणीच्या कामांची क्वालिटी कंट्रोलमार्फत चौकशी होईल. अधिकाऱ्यांनी चार दिवसांत या कामांचा अहवाल सादर करावा.” तसेच रस्ते आणि सिमेंट गटारे फोडून काम करणाऱ्या महावितरणवर नाराजी व्यक्त करत, “महावितरणने फोडलेले रस्ते दुरुस्त करून द्यावेत किंवा पैसे वर्ग करावेत. दोन्ही विभागांनी समन्वय ठेवावा,” असे निर्देश त्यांनी दिले. जि प अध्यक्षांनी जिल्ह्यातील अशा खोदलेल्या रस्त्यांचा आढावा घेण्यास सांगितले.
स्मार्ट मीटर आणि पी एम सूर्यघर योजना बाबतही आढावा घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ आम सभेला उपस्थित होते.




