मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, अध्यात्म आणि परंपरेचा गौरव जनमानसापर्यंत पोहोचविणे तसेच सांस्कृतिक मूल्यांविषयी जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमात अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांचे विशेष सादरीकरण होणार असून, भक्ती, अध्यात्म आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेचे विविध पैलू कलात्मक अभिव्यक्तीतून रसिकांसमोर साकार केले जाणार आहेत. त्र्यंबकेश्वरच्या पवित्र वातावरणात संगीत, अभिव्यक्ती आणि सांस्कृतिक सादरीकरणाच्या माध्यमातून भारतीय भक्तीपरंपरा, समन्वय, सहिष्णुता आणि आध्यात्मिकतेचा संदेश दिला जाणार आहे.
हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विभागामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, भाविक, कला रसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.




