ताज्या बातम्या

तमिळनाडूतही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांची आरोग्यमंत्री डॉ. के. जी. अरुणराज यांच्याशी सदिच्छा भेट

चेन्नई : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या धर्तीवर तमिळनाडूमध्येही गोरगरीब आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष स्थापन करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यानिमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख तथा आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी तमिळनाडूचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. के. जी. अरुणराज यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक व वैद्यकीय मदतीची माहिती मंगेश चिवटे यांनी मंत्र्यांना दिली. त्याच धर्तीवर तमिळनाडूमध्येही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष स्थापन करण्याबाबत आरोग्यमंत्री डॉ. अरुणराज यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
यासंदर्भात तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांच्याशी लवकरच चर्चा करून पुढील बैठकीसाठी पुन्हा चेन्नई येथे आमंत्रित करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. अरुणराज यांनी मंगेश चिवटे यांना दिले.
भेटीदरम्यान राज्याच्या आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा, सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, तसेच रुग्णकेंद्रित आरोग्य व्यवस्थापन या विषयांवरही दोघांमध्ये सखोल चर्चा झाली. आरोग्य क्षेत्रात परस्पर सहकार्य आणि अनुभवांची देवाणघेवाण अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास मंगेश चिवटे यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. अरुणराज यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमार्फत गोरगरीब रुग्णांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय मदतीचे विशेष कौतुक केले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध करून देणारा हा उपक्रम इतर राज्यांसाठीही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
चर्चेदरम्यान डॉ. अरुणराज यांनी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या नुकत्याच झालेल्या अभ्यास दौऱ्याचाही उल्लेख केला. तत्कालीन सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तमिळनाडूतील विविध आरोग्य संस्थांना भेट देऊन तेथील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा अभ्यास केला होता. त्यामधील प्रभावी योजनांचा महाराष्ट्रात अवलंब करण्याचा उद्देश त्या दौऱ्यामागे असल्याचेही त्यांनी सांगितले.
तामिळनाडू हे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देशात आदर्श राज्य मानले जाते. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये आरोग्य क्षेत्रातील अनुभवांची देवाणघेवाण आणि समन्वय वाढल्यास रुग्णकेंद्रित आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास मंगेश चिवटे यांनी व्यक्त केला.

Scroll to Top