मुंबई, दि. २ जुलै : दादर (पश्चिम) रेल्वे स्थानकालगतच्या उपेंद्र नगर परिसरात रिमझिम पावसातही जागोजागी पाणी साचत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिकेने नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात अल्प पावसातही पाणी तुंबत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
परिसरातील रस्त्यांवर साचलेल्या पाण्यातून पादचारी आणि वाहनचालकांना वाट काढावी लागत असून, यामुळे दैनंदिन वाहतुकीवरही परिणाम होत आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी नाल्यांची झाकणे उघडी असल्याने गंभीर दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
अद्याप मुसळधार पावसाला सुरुवात झालेली नसताना ही परिस्थिती निर्माण झाली असल्याने, आगामी पावसाळ्यात समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने परिसराची पाहणी करून पाणी निचऱ्याची व्यवस्था सुरळीत करावी, उघड्या नाल्यांवर झाकणे बसवावीत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.




