
नवी मुंबई : भारत सरकारच्या जनगणना 2027 च्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे. यंदाची जनगणना प्रथमत:च डिजिटल पद्धतीने होत असून, जनगणना प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त मास्टर ट्रेनर यांचेमार्फत एकूण 45 फील्ड ट्रेनर्सना 6 ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत सखोल प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये डिजिटल अॅपचा वापर, माहिती संकलनाची पद्धत तसेच नागरिकांशी संवाद साधण्याचे कौशल्य अशा विविध बाबींचा समावेश होता. अशा प्रशिक्षित फील्ड ट्रेनर्समार्फत नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणा-या ८ चार्ज जनगणना कार्यालयांमार्फत ३,७९७ प्रगणक (Enumerators) व पर्यवेक्षक (Supervisors) यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
आठ चार्ज जनगणना कार्यालयांतर्गत प्रगणक व पर्यवेक्षक यांनी दि. 16 मे 2026 पासून सर्व क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष जनगणनेच्या कामास सुरूवात केली आहे. प्रत्येक प्रगणकास नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चार्ज जनगणना अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त, यांच्या स्वाक्षरीचे ओळखपत्र आणि आदेश देण्यात आले आहेत. विविध प्रसिध्दी माध्यमांद्वारे जनगणना कार्यात सहभाग घेऊन, आपली सत्य व संपूर्ण माहिती प्रगणकांना देण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
प्रगणक जेव्हा घरी भेट देतील तेव्हा त्यांचे ओळखपत्र तपासून आपण स्वगणना केली असल्यास आपला SE ID त्यांना द्यावा अथवा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, ती ते नोंदवून घेतील आणि आपल्या घराची घरगणना प्रकिया पूर्ण होईल. जनगणना अधिकारी नागरिकांकडे कोणत्याही बँक खात्याची अथवा आधारकार्ड, पॅनकार्ड बाबतची माहिती मागत नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व अशा प्रकारची माहिती मागणा-या तोतयांपासून सावध रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जनगणनेच्या कार्यात अडथळा आणणा-या तथा प्रगणकांना माहिती न देता कामात अडथळा निर्माण करणा-यांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही सूचित करण्यात येत आहे.
जनगणनेतील घरगणनेच्या प्रश्नावलीमध्ये सर्वसाधारण खालील प्रश्नांचा समावेश आहे.
भाग 1: घराची स्थिती
१. गणना घराच्या जमिनीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य
२. गणना घराच्याभिंतीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य
३. गणना घराच्या छपरासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य
४. गणना घराची स्थिती
भाग 2: कुटुंबाची माहिती
५. कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या
६. कुटुंबप्रमुखाचे नाव
७. कुटुंबप्रमुखाचे लिंग
८. जर कुटुंबप्रमुख अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर प्रवर्गातील असल्यास
९. गणना घराच्या मालकी हक्काची स्थिती
१०. केवळ या कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या निवास योग्य खोल्यांची संख्या
११. या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या
भाग 3: कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी
१२. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत
१३. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत
१४. प्रकाशाचा मुख्य स्रोत
१५. शौचालयाची उपलब्धता
१६. शौचालयाचा प्रकार
१७. सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था
१८. स्नानगृहाची उपलब्धता
१९, स्वयंपाक घराची उपलब्धता आणि एलपीजी / पीएनजी जोडणी
२०. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन
भाग 4: कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता व इतर माहिती
२१. रेडिओ/ट्रान्झिस्टर
२२. दूरचित्रवाणी
२३. इंटरनेट उपलब्धता
२४. लॅपटॉप/संगणक
२५. दूरध्वनी/मोबाईल फोन/स्मार्टफोन
२६. सायकल/स्कूटर/मोटर सायकल/मोपेड
२७. कार/जीप/व्हॅन
२८. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य
२९. मोबाईल क्रमांक (फक्त जनगणनेसंबंधी संपर्ककरिता)
जनगणनेत संकलित होत असलेली माहिती देशाच्या विकासासाठी व नियोजनासाठी अत्यंत महत्वाची असून प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने हे आपले राष्ट्रीय कर्तव्य मानून आपल्या घरी जनगणना कामकाजासाठी येणा-या प्रगणकांना संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन प्रमुख जनगणना अधिकारी तथा महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.



