मुंबई : दादर पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गाच्या मधोमध असलेल्या विजयकुमार दळवी नगर येथील झोपडपट्टीवर रेल्वे प्रशासन आणि एमएमआरडीए (MMRDA) यांच्या संयुक्त पथकाने मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई करत झोपड्या जमीनदोस्त केल्या. पावसाळा तोंडावर असताना करण्यात आलेल्या या कारवाईमुळे स्थानिक झोपडीधारकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर रहिवाशांना एमयूएम (MUM) योजनेअंतर्गत विद्याविहार येथे स्थलांतरित करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, त्या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. “तेथे रस्ते नाहीत, परिसर असुरक्षित आहे, इमारतींच्या आजूबाजूला गर्दुल्ल्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत कुटुंबांचे जगणे कठीण झाले आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.
दादर रेल्वे स्थानक परिसरातील फुलमार्केट हे येथील अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. तसेच मुलांचे शिक्षणही दादर परिसरात सुरू असल्याने दूरस्थ भागात स्थलांतर करणे त्यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे “ही कारवाई म्हणजे झोपडीधारकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे,” असा गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांनी रेल्वे प्रशासन आणि एमएमआरडीएवर केला आहे.
या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माहीम विभागाचे निरीक्षक यशवंत विचले यांनी माहिती देताना सांगितले की, विजयकुमार दळवी नगर येथे एकूण ३२ कुटुंबे राहत होती. त्यापैकी १६ कुटुंबांनी स्थलांतरास तयारी दर्शवली, तर उर्वरित १६ कुटुंबांनी दादर परिसर सोडण्यास स्पष्ट नकार दिला.
स्थलांतरित झालेल्या काही कुटुंबांनी विद्याविहार येथील गैरसोयींमुळे पुन्हा दादर परिसरात परत येऊन तात्पुरते वास्तव्य सुरू केले असल्याचेही समोर आले आहे. स्थानिक रहिवासी हरी पायगुडे, गुरु वारिक, शिवाजी कोकितकर आदी नागरिक या रहिवाशांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत.
रहिवाशांची मुख्य मागणी अशी आहे की, त्यांना दादर किंवा जवळच्या परिसरातच पर्यायी घरे उपलब्ध करून द्यावीत. मुंबई महानगरपालिका तसेच पीएपी अंतर्गत उपलब्ध असलेली घरे एमएमआरडीए किंवा संबंधित प्रशासनाने द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, कारवाईदरम्यान स्थानिक आमदार महेश सावंत यांनीही घटनास्थळी भेट देत रेल्वे प्रशासन आणि एमएमआरडीएकडे प्रभावित कुटुंबांना योग्य व सन्मानजनक घरे उपलब्ध करून देण्याची मागणी केली.




