ताज्या बातम्या

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे ४ मे रोजी गोव्यात तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन

मुंबई : देशातील डिजिटल मीडियातील सर्वात मोठ्या संघटनांपैकी एक असलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन येत्या ४ मे २०२६ रोजी पणजी येथील कला अकादमीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत होणाऱ्या या महाअधिवेशनाचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून गोव्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष पाल देसाई उपस्थित राहणार असून महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उद्योग मंत्री उदय सामंत, गोव्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री रमेश तावडकर, आमदार निलेश राणे, खासदार सदानंद शेठ तनावडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत आणि राज्य सचिव विकास भोसले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या परिषदेला राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल पाटील, महेश कुगावकर, राष्ट्रीय महासचिव तेजस राऊत, राज्य उपाध्यक्ष संजय भैरे, मुंबई विभाग अध्यक्ष शशिकांत देशमुख आणि राज्य संघटक मयूर गलांडे उपस्थित होते.
या राष्ट्रीय अधिवेशनासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब आणि दिल्ली या राज्यांमधून हजारो संपादक व पत्रकार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमात उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रकट मुलाखत संस्थापक अध्यक्ष राजा माने घेणार आहेत. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
दुपारच्या सत्रात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संविधानिक स्वरूप’, ‘समाजमाध्यमांचा न्यायालयीन प्रक्रियेतील प्रभाव’ आणि ‘डिजिटल मीडियामध्ये एआयचा प्रभावी वापर’ या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
या महाअधिवेशनात डिजिटल मीडियाशी संबंधित विविध मागण्यांवर चर्चा करून केंद्र व राज्य शासनाकडे ठराव सादर केला जाणार आहे. या अधिवेशनामुळे डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात नवे दिशादर्शन होईल, असा विश्वास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी व्यक्त केला.

Scroll to Top