ताज्या बातम्या

महालक्ष्मी सरस २०२६ : महिलांच्या सशक्तीकरणाचा भव्य उत्सव मुंबईत;२ ते १४ मे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणाला नवे बळ देणारा “महालक्ष्मी सरस” हा उपक्रम आता प्रभावी जनआंदोलनाच्या रूपात पुढे येत आहे. राज्यात ५० लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’ सक्रिय असून, त्या केवळ उद्योजिका नसून रोजगारनिर्मिती करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देत आहेत. उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत या महिलांना प्रशिक्षण, कर्जसहाय्य आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे.

या पार्श्वभूमीवर “महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनी २०२६” चे भव्य उद्घाटन मुंबई येथील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे २ मे रोजी होणार असून, १४ मेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. यंदा ५०० स्टॉल्स उभारण्यात आले असून, त्यात महाराष्ट्रासह इतर राज्यांतील महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि विविध शासकीय संस्थांचा सहभाग आहे.
प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण म्हणजे ८० स्टॉल्सचा वातानुकूलित फूड कोर्ट, जिथे पारंपरिक खाद्यपदार्थांची मेजवानी मिळणार आहे. याशिवाय हातमाग वस्त्रे, वारली व बंजारा कला, दागिने आणि ग्रामीण उत्पादने खरेदीची संधी उपलब्ध आहे. एआर फोटोग्राफी, अॅनामॉर्फिक वॉल यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे.
उमेद-MSRLM चे CEO निलेश सागर (IAS) यांनी सांगितले की, हा उपक्रम महिलांना आत्मनिर्भर, सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्याचा प्रयत्न आहे. ‘लोकल टू ग्लोबल’ या संकल्पनेद्वारे महिला उद्योजकांना निर्यात व ई-कॉमर्सच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
“महालक्ष्मी सरस २०२६” हा केवळ प्रदर्शन नसून महिलांच्या नवोपक्रम, नेतृत्व आणि आर्थिक स्वातंत्र्याचा उत्सव ठरत असून, राज्याच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
Scroll to Top