मुंबई : मुंबई महानगरपालिकाच्या जी-उत्तर (धारावी) विभागातील सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक (प्र.) श्री. संतोष वावेकर हे ३८ वर्षांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय प्रशासकीय सेवेनंतर दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या गौरवासाठी दि. २५ फेब्रुवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल, धारावी येथील सभागृहात सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची अध्यक्षता सहाय्यक अभियंता श्री. किरणसिंग पाटील यांनी केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. वावेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यांच्या कन्येने सादर केलेल्या स्वागतगीतामुळे सभागृहात मंगलमय वातावरण निर्माण झाले. त्यानंतर श्री. वावेकर यांच्या ३८ वर्षांच्या सेवाकालाचा जीवनपट स्क्रीनवर सादर करण्यात आला.
गरिबीतून आलेल्या कुटुंबाने मुंबईत स्थिरावत शिक्षणाच्या बळावर प्रगती साधली. श्री. वावेकर यांनी ITI, Dip. S.I., B.A., M.A., LL.B. अशा विविध पदव्या संपादन करत महानगरपालिकेत कामगार पदापासून कनिष्ठ पर्यवेक्षक, पर्यवेक्षक आणि पुढे सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक या पदापर्यंत मजल मारली. नोकरी सांभाळत त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले तसेच संगीत कलेचीही जोपासना केली. त्यांच्या मुलाने हिंदी गीत सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. त्यांच्या पत्नी यांनी भावनिक मनोगत व्यक्त करत त्यांच्या संघर्षमय प्रवासाची आठवण करून दिली. त्या स्वतःही एक उत्तम शिक्षिका आहेत.
सत्काराला उत्तर देताना श्री. वावेकर म्हणाले, “मी कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर नोकरी करता करता शिक्षण पूर्ण केले. त्यामुळेच आजचा हा दिवस पाहायला मिळाला. कामगार वर्गानेही मेहनत व जिद्दीने इच्छित ध्येय गाठावे.”
कार्यक्रमास अनेक सेवानिवृत्त व कार्यरत अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. सन्माननीय नगरसेविका श्रीमती मोरे यांनीही उपस्थित राहून श्री. वावेकर यांना सदिच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे दादर-माहीम विभागाचे समुपदेशक (प्र.) आयु. रत्नकांत सावंत यांनी जगदीश ओहोळ लिखित “जग बदलणारा बाप माणूस – डॉ. बाबासाहेब आंबेडकर” हे पुस्तक श्री. वावेकर यांना भेट देऊन गौरविले.
शेवटी सूत्रसंचालक आयु. रविंद्र जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. स्नेहभोजनानंतर सर्वांनी श्री. वावेकर यांना गळाभेट देत भावपूर्ण निरोप दिला.




