मुंबई(योगेश त्रिवेदी) : बलराज साहनी /साहिर लुधियानवी फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा बलराज साहनी पुरस्कार या वर्षी ज्येष्ठ रंगकर्मी चतुरस्त्र अभिनेते रविंद्र देवधर यांना घोषित झाला असून, ३ मार्च रोजी पुण्यात एका विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) चे महाराष्ट्राचे सचिव बरोबरच कलाकृती निवडतांना वेगळा समाज प्रबोधनपर मार्ग निवडणारे अभिनेते व दिग्दर्शक म्हणून रविंद्र देवधर हे नाट्य वर्तुळात सुपरिचित आहेत.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अकथित पण महत्त्वपूर्ण पाने उलगडणाऱ्या, रविंद्र देवधर यांची संकल्पना व मुख्य भूमिका असलेल्या ‘मी भारतीय’ या दीर्घांकाचे २४९ प्रयोग त्यांनी केले आहेत. माजी एअर मार्शल भूषण गोखले, ऑस्करपर्यंत मजल मारलेले ज्येष्ठ कलाकार अरुण नलावडे यांसारख्या अनेक नामांकितांनी “प्रत्येक भारतीयाने अनुभवायला हवा असा नाट्यानुभव” या शब्दांत ‘मी भारतीय’ला गौरविलेले आहे.
अखिल भारतीय नाट्य परिषद – मध्यवर्ती शाखेचा ‘नाट्यकला मंदिर पुरस्कार’, अखिल भारतीय नाट्य परिषद – पुणे शाखेचा ‘भालबा केळकर पुरस्कार’, देवधर मंडळाचा ‘चतुरस्त्र व्यक्तिमत्व’ पुरस्कार याशिवाय विविध प्रवाहबाह्य नाट्यकृतींसाठी पटकावलेली राज्य नाट्य स्पर्धेची अनेक पारितोषिके देवधर यांच्या नावावर यापूर्वीच जमा आहेत.
बलराज साहनी पुरस्कार वितरण मंगळवार, ३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात एका विशेष कार्यक्रमात होणार आहे. त्यानंतर ‘मी भारतीय’ नाट्य प्रयोग सादर होणार आहे.
याशिवाय या कार्यक्रमात चित्रपट समीक्षक, मुक्त पत्रकार कृपाशंकर शर्मा यांना ‘साहिर लुधियानवी पुरस्कार’, डॉ. बालाप्रसाद बडायले यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ आणि छायाचित्रकार व आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते दीप्ती लोंढे यांना महान दिग्दर्शक ऋत्विक घटक ह्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘ऋत्विक घटक पुरस्कार’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.




