कराड : (अमोल पाटील) :सातारा व सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील जिंती गावच्या पठारावर वसलेले पुरातन स्वयंभू श्री पीर साहेब मंदिर हे परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असून येथे अनेक दशकांपासून पीर उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे. जुन्या दगडी बांधकामामुळे जीर्ण झालेल्या मंदिराचा जीर्णोद्धार स्थानिक भक्तांच्या लोकवर्गणीतून नुकताच पूर्ण करण्यात आला आहे.
तब्बल ३० दशकांनंतर मंदिराचा भव्य कलशारोहण व जीर्णोद्धार सोहळा गुरुवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी जिंती (ता. कराड) येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. मंदिरात विविध धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि मंत्रोच्चारांच्या गजरात कार्यक्रम होणार असून परिसरात सध्या उत्साहाचे वातावरण आहे.
लोकवर्गणीतून उभारलेल्या मंदिराच्या शिखरावर कलशारोहण शिवयोगी शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यतत्पर आमदार अतुल भोसले, उदयसिंह पाटील (चेअरमन, रयत सहकारी साखर कारखाना), राजेंद्र पाटील (राजाभाऊ), सुभाष महादेव पवार, बाजीराव देसाई (संस्थापक अध्यक्ष, ज्ञान कृपा सहकारी पतपेढी) तसेच तानाजी चवरे (कराड तालुका कुस्ती संघटक) उपस्थित राहणार आहेत.
आयोजक खोचरे परिवाराच्या वतीने या सोहळ्यासाठी जिंतीसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले असून जिंतीच्या पठारावर भक्तांची अलोट गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे परिसरातील धार्मिक व सामाजिक उपक्रमांना नवे बळ मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली असून या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.




