पनवेल : पळस्पे, ता. पनवेल – पळस्पे येथील द्वारकाधीश मॉलमध्ये नव्याने सुरू झालेल्या ‘द्वारकाधीश मॉलचे उद्घाटन ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री अक्षया देवधर (अंजली पाठक) यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. स्थानिक नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात फीत कापून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी स्वामींच्या मंदिराचे पूजन तसेच स्वामींच्या आकर्षक कलाकृतीचे दर्शन उपस्थितांना घडविण्यात आले.
आपल्या मनोगतात अभिनेत्री अक्षया देवधर यांनी नवीन व्यवसायासाठी संचालकांना शुभेच्छा देत ग्राहकांना उत्कृष्ट सेवा आणि दर्जेदार साड्यांची हमी देण्याचे आवाहन केले. “स्थानिक महिलांना येथे पारंपरिक व आधुनिक साड्यांचा उत्तम संग्रह मिळेल, याचा आनंद आहे,” असे त्या म्हणाल्या.
द्वारकाधीश साडी सेंटरमध्ये विविध प्रकारच्या पारंपरिक, डिझायनर व आधुनिक साड्यांचा आकर्षक संग्रह उपलब्ध असून, उद्घाटनानिमित्त महिलांसाठी विशेष सवलतींची घोषणा करण्यात आली आहे.
या सोहळ्यास अनेक मान्यवर, व्यापारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम प्रकारे पार पडले आणि आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




