गोडोली(विजय जाधव) : आंधळी (ता. माण, जि. सातारा) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत आंधळीच्या वतीने भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण परंपरा, शौर्य आणि शेतकरी संस्कृतीचा अभिमान असलेल्या या शर्यती पाहण्यासाठी या, असे आवाहन सरपंच दादासाहेब काळे यांनी केले आहे.
गुरुवार दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता आंधळी ते टाकेवाडी रोडवर ही थरारक शर्यत रंगणार असून, राज्यभरातील नामवंत बैलगाडी संघांचा सहभाग अपेक्षित आहे.
या स्पर्धेत प्रथम -रु.६१ हजार , द्वितीय रु. ४९ हजार , तृतीय रु.३१ हजार , चौथा रु.२१ हजार , सहावा रु.१० हजार त, सातवा रु.६ हजार अशी आकर्षक रोख पारितोषिके आणि दोन मानाच्या ढाली ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कॉटर फायनलपर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक गाडीला रु.२ हजार आणि दोन मानाच्या ढाली देण्यात येणार आहेत. प्रवेश फी रु.७०० ठेवण्यात आली आहे.
कार्यक्रमाला अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शन लाभणार असून, प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे राज्य सचिव पै. विलास देशमुख (वाई) उपस्थित राहणार आहेत. अनुभवी पंच, उद्घोषक आणि संयोजकांच्या उपस्थितीत शर्यतीचे आयोजन काटेकोर नियमांनुसार होणार आहे.
ग्रामीण खेळ संस्कृती जोपासत बैलगाडा शर्यतीमुळे उपक्रमामुळे पुन्हा आंधळी गाव एकदा चर्चेत येणार आहे. बैलगाडी शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सरपंच दादासाहेब काळे यांनी केले आहे.




