ताज्या बातम्या

श्री. काळेश्वरी मित्र मंडळ (मुंबई) सावरी व महिला मंडळातर्फे हळदी–कुंकू व ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

महाबळेश्वर – सावरी गावातील सासरवाशिणी व माहेरवाशिणींसाठी श्री. काळेश्वरी मित्र मंडळ (मुंबई) सावरी आणि श्री. काळेश्वरी महिला मंडळ (मुंबई) सावरी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री. रांजणदेवी मंदिर हॉल, कोपरखैरणे (नवी मुंबई) येथे हळदी–कुंकू समारंभ व करमणुकीचा ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व सावरी गावच्या ग्रामदैवत श्री काळेश्वरी देवाचे स्मरण करून करण्यात आली. तसेच गणपती रायाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष श्री. अंकुश गोविंद शिंदे व कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते विधिवत पूजन झाले. सावरी गावच्या परंपरेनुसार पाच सुवासिनींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
कु. ऋतुजा प्रकाश शिंदे, कु. स्वरा प्रकाश शिंदे व कु. लावण्या श्रीरंग शिंदे यांनी सुमधुर स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी सावरी गावातील कन्या व सासरवाशिणी-माहेरवाशिणींनी मनोगत व्यक्त करत मंडळाच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
‘होम मिनिस्टर’मध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या ‘होम मिनिस्टर’ खेळात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कलाकार श्री. राजेश सुरेश कदम यांनी खेळाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करून वातावरण रंगतदार केले. विजेत्या महिलांसाठी तब्बल ३८ बक्षिसे ठेवण्यात आली होती.
मानाच्या पैठणीसाठी झालेल्या अंतिम फेरीत सौ. शिल्पा रघुनाथ सपकाळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सौ. प्रियांका योगेश कांबळे यांनी द्वितीय तर सौ. स्मिता सिताराम शिंदे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. प्रथम क्रमांक विजेत्यास मानाची पैठणी प्रदान करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती व सहकार्य
कार्यक्रमास अध्यक्ष – आधार फाऊंडेशन, रोहोटचे श्री. भानुदास निकम, ज्येष्ठ सल्लागार श्री. कृष्णा गेनु शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. श्री. निकम यांनी सावरी गावाच्या एकीचे व महिला मंडळाच्या एकसमान साडी ड्रेसकोडचे विशेष कौतुक केले. पुढील काळातही ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमासाठी भेटवस्तू देण्याची घोषणा त्यांनी केली.
हळदी-कुंकूसाठी वाण व भेटवस्तूंचे सहकार्य श्रीमती नंदाताई सुरेश जाधव व सौ. मृणालताई विकास जाधव यांनी केले. चहा-नाश्ता, जेवण व्यवस्था व संपूर्ण नियोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मित्र मंडळ व महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. महिला मंडळाने आर्थिक निधी उभारून नारीशक्तीची एकी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आनंद शिंदे (आण्णाबुवा) यांनी केले. प्रस्तावना सचिव श्री. अमोल (सिताराम) महादेव शिंदे यांनी मांडली व शेवटी उपस्थित मान्यवर व सर्व सासरवाशिणी-माहेरवाशिणींचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top