प्रतिनिधी : अहिल्यानगर (अहमदनगर) येथील अवघ्या १९ वर्षीय देवव्रत महेश रेखे या युवकाने काशी येथे शुक्ल यजुर्वेद संहिता (दंडक्रम पारायण) अवघ्या ५० दिवसांत कंठस्थ करून ऐतिहासिक कामगिरी साध्य केली आहे. गेल्या सुमारे २०० वर्षांत शक्य न झालेली ही कठीण साधना पूर्ण करत त्यांनी वैदिक परंपरेत मोलाची भर घातली आहे.
कठोर परिश्रम, एकाग्रता आणि अखंड साधनेच्या जोरावर देवव्रत यांनी केवळ ५० दिवसांत यजुर्वेदाचे दंडक्रम पारायण पूर्ण केले. वैदिक शिक्षणातील अत्यंत उच्च आणि सन्माननीय मानल्या जाणाऱ्या ‘वेदमूर्ती’ या पदवीने त्यांना गौरविण्यात आले आहे. एवढ्या लहान वयात ही सिद्धी मिळवणारे ते दुर्मिळ उदाहरण ठरले आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल मुंबईतील गिरगाव येथे त्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. ब्राह्मण सभा, मुंबई यांच्या वतीने हा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मांदार बेडेकर तसेच महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते देवव्रत रेखे यांचा गौरव करण्यात आला.
तसेच जीएसबी टेम्पल ट्रस्ट, मुंबई यांच्या तर्फेही त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे मानद सचिव व कायम विश्वस्त दीपक वालावलकर, तसेच विश्वस्त अवधूत दाभोळकर आणि हेमंत सुधाकर सामंत उपस्थित होते.
देवव्रत रेखे यांची ही कामगिरी वैदिक परंपरेचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत प्रसार करण्याच्या दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी मानली जात आहे. त्यांच्या या यशामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा गौरव वाढला असून तरुणाईसमोर एक आदर्श निर्माण झाला आहे




