ताज्या बातम्या

जप्त वाहन सोडवून देण्यासाठी ५ हजारांची लाच मागणारी महिला पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

सातारा : म्हसवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदाराने जप्त वाहन सोडवून देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करत संबंधित हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
निता नारायण पळे (बॅ. नं. १७९६), रा. क्रांतीसूर्यनगर, म्हसवड, असे आरोपी महिला पोलीस हवालदाराचे नाव आहे. त्या म्हसवड पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या.
तक्रारदार यांच्याविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात गुरनं. ०६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन अधिनियमातील विविध कलमान्वये दिनांक ०२ जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तक्रारदार यांची मारुती सुझुकी कंपनीची ओम्नी कार (क्रमांक एम.एच. ४५ एन ६७२९) जप्त करण्यात आली होती.
सदर जप्त वाहन सोडवून देण्यासाठी मदत करते, असे सांगून पोलीस हवालदार निता पळे यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा येथे प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक ०७ जानेवारी २०२६ रोजी एसीबीने पडताळणी करून सापळा कारवाई केली.
पडताळणी व सापळा कारवाईदरम्यान पंचासमक्ष तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी महिला पोलीस हवालदार निता पळे यांच्याविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात गुरनं. ४६/२०२६ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील सापळा पथकाने केली. तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे काम पाहत असून, या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उप-अधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांनी केले. मार्गदर्शन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले (लाप्रवि, पुणे परिक्षेत्र) यांनी केले.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही लोकसेवकाने कामासाठी लाच मागितल्यास किंवा खाजगी इसमामार्फत लाच मागितली गेल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top