ताज्या बातम्या

धगधगती मुंबई वृत्तपत्राचा राज्यस्तरीय ‘वैद्यकीय रत्न पुरस्कार’ हाडवैद्य सचिन (समीर) वरखडे यांना जाहीर

नवी मुंबई : हाडवैद्य क्षेत्रात तसेच सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय ‘वैद्यकीय रत्न पुरस्कार’ कोपरखैरणे येथील सुप्रसिद्ध हाडवैद्य सचिन (समीर) हरिभाऊ वरखडे यांना जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृह, सेक्टर ४-५, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे होणाऱ्या भव्य समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
सचिन वरखडे यांचा जन्म १२ ऑगस्ट १९७७ रोजी सातारा जिल्ह्यातील वरखडवाडी (ता. वाई) येथे झाला. त्यांनी एच.एस.सी. शिक्षणासह निसर्गोपचार तज्ञ, Naturopathy & Yoga Therapy (Alternative Medical Council, Calcutta) या अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केले आहे.
सन १९९५ पासून मुंबईत वास्तव्यास असलेल्या वरखडे यांनी १९९७ पासून हाडवैद्य व्यवसायास सुरुवात केली असून आजतागायत त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. देशी उपचार पद्धतीने हाडे, मणके, नसा व सांध्यांचे उपचार करणारे हाडवैद्य म्हणून त्यांची ओळख आहे.
ही उपचारपद्धती त्यांना खानदानी वारशातून लाभली आहे. त्यांचे वडील कै. हरिभाऊ रावजी वरखडे हे सन १९६० पासून लोकसेवा करीत होते. त्यानंतर काका कै. किसन गुलाबराव वरखडे यांनीही मुंबईत ही सेवा पुढे नेली. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली सचिन वरखडे यांनी ही कला आत्मसात करून प्राविण्य मिळवले.
वैद्यकीय क्षेत्रासोबतच त्यांनी सामाजिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे. कुस्ती या खेळाच्या प्रसारासाठी आखाडे उभारणे, व्यायामशाळांना मदत, तसेच क्रिकेट, खो-खो, कबड्डी यांसारख्या खेळांना प्रोत्साहन देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. याशिवाय अनाथाश्रम, वृद्धाश्रम, सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था, गणेशोत्सव, दहीहंडी, गोविंदा पथक, हरिभक्त पारायण मंडळ, रक्तदान शिबिरे, वृक्षसंवर्धन व आरोग्य शिबिरांचे आयोजन अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत यापूर्वीही त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यात सातारा भूषण पुरस्कार (२०१८), कुस्ती संघटक पुरस्कार (२०१८), पश्चिम महाराष्ट्र भूषण पुरस्कार (२०२०), राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार (२०२०) तसेच Best Chiropractor (Bone Setter) of the Year 2021 यांचा समावेश आहे.
आता धगधगती मुंबई वृत्तपत्राचा ‘राज्यस्तरीय वैद्यकीय रत्न पुरस्कार’ जाहीर झाल्याने त्यांच्या कार्याचा गौरव अधिक दृढ झाला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top