ताज्या बातम्या

उत्तर मुंबई उपनगर भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा संस्था, मालाड — शिस्त, सेवा आणि संस्कारांचा तेजस्वी सोहळा

मुंबई (खंडुराज गायकवाड) : शिस्त, सेवाभाव आणि राष्ट्रनिष्ठेची मूल्ये जोपासणाऱ्या स्काऊट-गाईड चळवळीचा प्रेरणादायी उत्सव ठरलेला उत्तर मुंबई उपनगर भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा संस्थेचा दोन दिवसीय जिल्हा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखदार स्वरूपात संपन्न झाला. युवा शक्तीच्या उमलत्या उर्जेने आणि सेवाभावाच्या तेजाने हा मेळावा अक्षरशः उजळून निघाला
मालाड येथील जिल्हा कार्यालयाच्या वतीने आयोजित या मेळाव्यात १७ शाळांमधील तब्बल ८७८ स्काऊट-गाईड विद्यार्थी तसेच ३६ युनिट लीडर्स यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून शिस्तबद्ध संघटनशक्तीचे प्रभावी दर्शन घडविले.
पूर्ण प्रज्ञा स्कूल, दहिसर (पूर्व) आणि सेंट लुईस हायस्कूल, दहिसर (पश्चिम) येथे अनुक्रमे दि. ६ व ७ फेब्रुवारी २०२६ रोजी हा मेळावा रंगला.
जिल्हा मुख्य आयुक्त श्री. संजय जावीर, शिक्षण निरीक्षक (बृहन्मुंबई पश्चिम विभाग) जोगेश्वरी पूर्व, जिल्हा आयुक्त (स्काऊट) श्री. नाईक, जिल्हा आयुक्त (गाईड) श्रीमती निशा वैदू, जिल्हा चिटणीस श्री. सोफी तसेच जिल्हा सहचिटणीस श्री. कोठाळे यांच्या शुभेच्छांनी कार्यक्रमाला प्रेरणेचा नवा आयाम लाभला.
मेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्याला विशेष दिमाख लाभला. शाळेचे संस्थाचालक श्री. सर्वज्ञ उडप्पा आणि मुख्याध्यापक श्री. अरुण कुमार दुबे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. प्रार्थना आणि ध्वजारोहणाच्या पवित्र क्षणांनी वातावरणात राष्ट्रभक्तीची आणि एकात्मतेची भावना दाटून आली.
माजी जिल्हा आयुक्त (गाईड) तसेच रायगडचे उपशिक्षण निरीक्षक श्रीमती हेमलता गावित आणि मंत्रालयातील ज्येष्ठ पत्रकार व लोककला अभ्यासक खंडूराज गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांचा आणि राष्ट्रसेवेचा प्रेरणादायी संदेश दिला. ध्वजारोहणानंतर काढण्यात आलेल्या शोभायात्रेने शिस्त, संघभावना आणि उत्साह यांचे प्रभावी दर्शन घडविले. विशेष बँड पथकाच्या सुरेल निनादात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
जिल्हा संघटक श्रीमती अमिता कोंबाडे आणि जिल्हा संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांतून हा मेळावा यशस्वीपणे पार पडला. मेळाव्यात मार्च पास्ट, उत्कृष्ट स्काऊट-गाईड, फर्स्ट एड, पायोनियरिंग, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट, रांगोळी, समूहगीत, लोकनृत्य, उत्कृष्ट संघ अशा एकूण १० स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांचा प्रभावी आविष्कार सादर केला.
दीर्घकाळ सेवाभावाने कार्य करणाऱ्या सेवानिवृत्त स्काऊटर-गाईडर शिक्षकांचा मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
स्पर्धांचे परीक्षक म्हणून श्री. महारुद्र बोलार (लीडर ट्रेनर), श्री. गिरीश कांबळे (माजी राज्य प्रशिक्षण आयुक्त) यांच्यासह विविध मान्यवरांनी जबाबदारी पार पाडली. यामध्ये श्री. गौरव वनकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
विजेत्या स्पर्धकांना आणि सर्वाधिक नोंदणी करणाऱ्या शाळेला पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सर्वधर्मीय प्रार्थना आणि राष्ट्रगीताच्या गंभीर व भावपूर्ण वातावरणात या प्रेरणादायी मेळाव्याची सांगता झाली.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top