ताज्या बातम्या

धगधगती मुंबईतर्फे ज्योतिष विद्यावाचस्पती विजयकुमार स्वामी यांना राज्यस्तरीय अध्यात्मिक पुरस्कार जाहीर

मुंबई : उल्लेखनीय अध्यात्मिक साधना, समाजाभिमुख कार्य आणि निस्वार्थ सेवाभावासाठी ज्योतिष विद्यावाचस्पती श्री विजयकुमार स्वामी यांना धगधगती मुंबई वृत्तपत्र समूहाच्या वतीने राज्यस्तरीय अध्यात्मिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुणे येथे कार्यरत असलेले विजयकुमार स्वामी हे केवळ ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक नसून, समाजालाच ईश्वर मानून सेवा करणारे सेवाव्रती व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
आपल्या ज्योतिषज्ञानाचा उपयोग त्यांनी कधीही वैयक्तिक स्वार्थासाठी न करता समाजातील दुःखी, कष्टी व उपेक्षित घटकांच्या जीवनात आशेचा प्रकाश निर्माण करण्यासाठी केला आहे. संत तुकाराम महाराजांच्या “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणावे आपले” या विचारांचे ते जिवंत उदाहरण मानले जातात. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर, पुस्तके वाटप, गरजूंना ब्लँकेट वितरण, विद्यार्थी वसतिगृह व वृद्धाश्रमांमध्ये अन्नदान असे अनेक उपक्रम सातत्याने राबवले आहेत.
त्यांनी स्थापन केलेली भक्ती प्रकाशन ही संस्था गेल्या पंधरा वर्षांपासून कार्यरत असून, दसरा व दिवाळीच्या पर्वावर प्रकाशित होणारा ‘भविष्य’ वार्षिकांक समाजप्रबोधनाचे कार्य करत आहे. या प्रकाशनातून मिळणारे उत्पन्नही समाजकार्यासाठी अर्पण केले जाते.
हा पुरस्कार सोहळा स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृह, सेक्टर ४/५, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार असून, या घोषणेमुळे विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top