मुंबई : धारावीतील नामवंत लेदर उद्योगपती व समाजसेवक श्री. रमेश नारायण कदम (केमकर) यांना त्यांच्या उद्योजकतेसोबतच समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल धगधगती मुंबई वृत्तपत्र यांच्यावतीने राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार नवी मुंबईतील स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृह, सेक्टर ४-५, कोपरखैरणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
श्री. रमेश कदम यांनी केमिकल टॅनिंग व्यवसायात परदेशी बाजारपेठ मिळवून मोठे यश संपादन केले आहे. कोणतेही औपचारिक शिक्षण नसतानाही मेहनत, चिकाटी व प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी व्यवसायाची भक्कम उभारणी केली. एअर इंडियातील नोकरी सोडून वडिलांच्या मार्गदर्शनानुसार व्यवसायात उतरल्याने आज ते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.
कै. नारायण गणूजी कदम यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत रमेश कदम समाजातील युवकांना व्यवसाय व शिक्षणाबाबत मार्गदर्शन करत आहेत. समाजाची प्रगती प्रत्येकाने स्वतःपासून सुरू करावी, हा संदेश ते सातत्याने देतात. उद्योग, समाजसेवा आणि प्रेरणादायी विचार यांचा संगम असलेल्या रमेश कदम यांना मिळणारा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार हा त्यांच्या कार्याची योग्य दखल असल्याचे मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.




