ताज्या बातम्या

धगधगती मुंबई वृत्तपत्रातर्फे लोककलावंत योगेश चिकटगावकर यांना कलागौरव पुरस्कार जाहीर

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला जपणारे, वाढवणारे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध अष्टपैलू युवा लोककलावंत व सिने पार्श्वगायक प्रा. योगेश माणिकराव चिकटगावकर यांना धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या वतीने कलागौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारत सरकारचा युवा प्रतिभा पुरस्कार प्राप्त योगेश चिकटगावकर यांनी लोककला, नाट्य, चित्रपट व प्रशिक्षण या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या माध्यमातून गेल्या १३ वर्षांत सुमारे ३५० विद्यार्थ्यांना लोककलेचे प्रशिक्षण देत त्यांनी अनेक कलाकार घडवले. पिंगळा, सोंगी भारुड, लोकनाट्य आदी लोककला प्रकारांचे हजारो प्रयोग त्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर सादर केले आहेत. “पिंगळा महाव्दारी”, “तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला”, “ऊचल तुझी तलवार मराठ्या” यांसारखी लोकगीते व लोकनाट्य प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत.
दूरदर्शन व खासगी वाहिन्यांवरील मालिकांमधील त्यांच्या भूमिका तसेच रियालिटी शोमधील लोककला सादरीकरणे लोकप्रिय ठरली आहेत. चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक, अभिनेता, लेखक व संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
हा कलागौरव पुरस्कार समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथील स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृह, सेक्टर ४/५, कोपरखैरणे येथे प्रदान करण्यात येणार आहे. लोककलेच्या संवर्धनासाठी दिलेल्या भरीव योगदानाची दखल घेत धगधगती मुंबईतर्फे हा सन्मान जाहीर करण्यात आला असून, कला क्षेत्रातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top