ताज्या बातम्या

वरिष्ठ पत्रकार अजित जगताप यांना ‘धगधगती मुंबई’तर्फे जीवन गौरव पुरस्कार जाहीर

सातारा : सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ व निर्भीड पत्रकार अजित काशिनाथ जगताप (वय ६१) यांना धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गेली तब्बल तीस वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले अजित जगताप यांनी सातारा प्रतिनिधी म्हणून विविध वृत्तपत्रांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.
मुंबईतील दैनिक नवशक्ती, दैनिक नवाकाळ तसेच साप्ताहिक लोकप्रभा व साप्ताहिक सकाळ यामध्ये त्यांनी विविध सामाजिक, राजकीय व जनहिताच्या विषयांवर लेखन केले. सातारा जिल्ह्यातील दैनिक सांजवात, पुढारी, तरुण भारत आणि विशेषतः जिल्ह्याचे मुखपत्र असलेल्या दैनिक ऐक्य व ग्रामोद्वारमध्ये काम करताना त्यांनी परखड व परिणामकारक बातमीदारी केली.
त्यांच्या काही बातम्यांची दखल थेट विधिमंडळ अधिवेशनात घेण्यात आली. तीर्थक्षेत्र श्री मेरुलिंग (ता. जावळी) येथील दलित समाजावर असलेली अन्यायकारक पाणीप्रथा कायमस्वरूपी बंद होण्यात त्यांच्या पत्रकारितेचा मोलाचा वाटा आहे. धरणग्रस्तांच्या प्रश्नांवरही त्यांनी सातत्याने आवाज उठवला.
पत्रकारितेबरोबरच सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधत सामान्य नागरिकांना सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये धगधगती मुंबई व DDM News माध्यमातूनही त्यांची बातमीदारी सुरू आहे. राज्य शासनाने यापूर्वी त्यांना वरिष्ठ पत्रकार म्हणून सन्मानित केले आहे.सदर कार्यक्रम नवी मुंबई स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृह सेक्टर 4/5 कोपरखैरणे नवी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. या जीवन गौरव पुरस्काराच्या घोषणेमुळे पत्रकार व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top