पनवेल : महायोगी प.पू. स्वामी गगनगिरी महाराज यांच्या समाधी दिन स्मृतीदिनाचा १८ वा वर्षपूर्ती सोहळा बुधवार, दि. ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने परमशांतीधाम वृद्धाश्रम, तळोजा एम.आय.डी.सी., टेक्नोवा कंपनीजवळ (ता. पनवेल, जि. रायगड) येथे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याची सुरुवात सकाळी ६ ते ७ काकड आरतीने होणार असून सकाळी ७ ते ८ श्रींचा अभिषेक, सकाळी ८ ते ९ श्रीगुरु नामस्मरण, सकाळी ९ ते ११ श्री गुरुसप्तशती वाचन, सकाळी ११.३० ते १२.३० हवन, दुपारी १२.३० आरती व दुपारी १ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पावन प्रसंगी आखाडा परंपरेतील साधू समाज उपस्थित राहणार असून त्यांच्या दर्शनाचा लाभही भाविकांना मिळणार आहे. तरी सर्व गगनगिरी भक्तांनी व सत्संग मंडळांनी या समाधी दिन सोहळ्यास उपस्थित राहून श्रीगुरुदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वामी आबानंदगिरीजी महाराज, भक्त परिवार व परमशांतीधाम उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.




