सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्हा परिषद व अकरा पंचायत समितीमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. सर्व समाजाचे हक्क अबाधित राखणाऱ्या उमेदवारांनाच निवडून दिले हे लोकशाहीतील कर्तव्य आहे. अशाच पद्धतीने मूळ ओबीसी असलेल्या उमेदवाराला चळवळ जिवंत ठेवण्यासाठी मतदान करणे जबाबदारी आहे ती निश्चित पार पाडावी असे नम्र आवाहन सातारा जिल्हा ओबीसी बहुजन आघाडीचे कार्य अध्यक्ष श्री प्रमोद क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
ओबीसींच्या आरक्षणाला व हक्काला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल अशी घोषणा करणाऱ्या भाजपने काही ठिकाणी मूळ ओबीसी ऐवजी बोगस कुणबी मराठा दाखला काढून निवडणूक लढवण्यास प्रवृत्त केले आहे. हे कमळाचे फुल आपल्या गोरगरिबांच्या झेंडू फुलावर अतिक्रमण करत आहे. याचे भान आता सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे. आज जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून कुणबी मराठा करण होत आहे. यापासून सावध राहिले पाहिजे.
ज्यांच्या जातीच्या दाखल्यावर पाच ते दहा वर्षांपूर्वी नोंदी झालेली आहेत असे कुणबी मराठा बांधव हे आमचे ओबीसी आहेत. त्यांना आमचा कदापी विरोध राहणार नाही. परंतु त्यांनीही ओबीसी चळवळीला तेवढ्याच तत्परतेने योगदान देणे याची आठवण आम्ही करून देत आहोत. त्यांना आमचा कधीही पाठिंबाच राहील. परंतु आर्थिक निकषावर आणि संधी साधूपणा म्हणून एका बाजूला कुणबी मराठा दाखला काढायचा दुसऱ्या बाजूला आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे हिंदू मराठा किंवा मराठा असे दाखल्यावर नोंदी आढळून येणे म्हणजे एक प्रकारे एक व्यक्ती आणि दोन जात.. एक फुल दो माली असा त्याचा ढोबळ अर्थ आहे. या प्रवृत्तीला आमचा विरोध राहील.
निवडणुका येतील व जातील.. परंतु, चळवळ जर संपली तर भावी पिढीला आपल्याला तोंड दाखवता येणार नाही. आज काही कुणबी मराठा उमेदवारासाठी तत्परतेने सर्वसाधारण सुवर्ण समाज व उमेदवार प्रचारात आघाडीवर आहे. त्यांनी ओ.बी.सी. समाजाच्या चळवळीला कधी सक्रिय सहभाग घेतला. याचा पुरावा द्यावा. स्वतःच्या फायद्यासाठी ओबीसी बनणे आणि ओबीसींवर अन्याय होईल त्यावेळेला अन्याय करणारा ची बाजू घेणे हा दुटप्पी पणा आहे. त्यामुळे ही निवडणूक माझी खऱ्या अर्थाने लोकशाहीची सत्वपरीक्षा आहे. आज सातारा जिल्ह्यातील सातारा व कोरेगाव, वाठार स्टेशन, कुडाळ, म्हसवे, केंजळ, शेंद्रे, कराड, फलटण, खटाव व वाई, महाबळेश्वर, खंडाळा, कोडोली , वर्णे, कुकुडवाड, माण तालुक्यात मोठ्या प्रमाणात ओ.बी.सी. समाजामध्ये जनजागृती झालेली आहे. ५७ जातीचे ओ.बी.सी. युवा पिढी मध्ये जागृती झालेली आहे परंतु काही लाचार व स्वाभिमान शून्य ओबीसी आपली जात विकण्यास काढत आहे त्यांनीही सावध राहावे असे आवाहन केले आहे.
यावेळी रामचंद्र बनवडे ,सिद्धार्थ खरात, दत्ताजीराव जाधव, अनिल लोहार, बबन झोरे, बाळासाहेब ढेबे, विठ्ठल चव्हाण, प्रकाश काशीद, नम्रता शेडगे, संदीप ससाणे, जयवंत बोराटे, ज्योतिराव फरांदे, कमल गोरे यांच्यासह ओबीसी घटकातील विशेषतः मूळचे कुणबी मराठा असलेले प्रकाश पाटील यांचाही सहभाग होता.




