कोळेवाडी–तुळसण : कोळेवाडी ते तुळसण खिंड परिसरातील क्रेशर व दगड उत्खननाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. वाऱ्यासोबत धुळीचे कण परिसरात पसरत असून, त्यामुळे हवेच्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
उत्खननाच्या ठिकाणी मोठ्या यंत्रसामग्रीद्वारे दगड फोडणे, वाहतूक करणे तसेच क्रशिंगचे काम सुरू असल्याने हवेत धुळीचे कण मिसळत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, धूळ नियंत्रणासाठी आवश्यक असलेली पाणी फवारणी, वाहतुकीदरम्यान धूळ नियंत्रण आणि इतर पर्यावरणीय उपाययोजना प्रत्यक्षात कितपत केल्या जात आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या परिसरातून नागरिक व वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. धुळीमुळे वाहनचालकांच्या दृष्टीवर परिणाम होऊन अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच सतत धुळीच्या संपर्कामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
प्रदूषण नियंत्रण विभागाने प्रत्यक्ष पाहणी करावी
क्रेशर व उत्खननासाठी आवश्यक परवानग्या आहेत का, पर्यावरणीय अटींचे पालन केले जात आहे का, धूळ नियंत्रणाच्या उपाययोजना केल्या जातात का, याची प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल व संबंधित विभागांनी संयुक्तपणे पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नियम कागदावरच की प्रत्यक्षात?
कोळेवाडी–तुळसण खिंडीतील या धुळीच्या प्रश्नावर प्रशासन आता कोणती कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




