सातारा
(अजित जगताप) : संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दुःखाची छाया पसरणारा प्रसंग म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघाती निधन होय. या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली. सातारा जिल्हा व अजित दादा पवार यांचे नाते हे कौटुंबिक आणि भूमिपुत्र म्हणून कायमचे स्मरणात राहणार आहे. सातारा येथील संगम माहुली कृष्णा तीरी दिवंगत अजितदादांचे अस्थी विसर्जन करण्यात आल्या.त्यांच्या विचाराचे वारसदार असलेले जावळीचे सुपुत्र श्री अमितदादा कदम यांच्या हस्ते अस्थी विसर्जन झाले. यावेळी अनेकांचे डोळे पाणवले.
सातारा जिल्ह्यामध्ये १९९९ साली ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्याचवेळी सातारा जिल्ह्यातील जुन्या व नव्या पिढीतील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या हाती बांधले. एवढेच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्हा राष्ट्रवादीमय केला.
सहकार, समाजकारण राजकारण व शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी शिवाय पर्याय राहिला नव्हता. आणि ही किमया करण्यामध्ये दिवंगत अजितदादा पवार यांचा करिष्मा होता. त्यांच्यामुळेच सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि जिल्हा बँक तसेच सहकारी चळवळीतील संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवण्यात यश आले होते.
आज दुर्दैवाने त्याच नेत्याच्या अस्थी
विसर्जनाचे काम युवा नेते अमित दादा कदम यांना पार पाडावे लागले. जड अंतकरणाने हातात घेतलेल्या अस्थी कृष्णा कोयनेच्या संगमावर सोडताना श्री अमितदादा कदम यांचे हृदय गहिवरून आले होते. अनेक आठवणी मनामध्ये जतन केल्या असल्या तरी दिवंगत अजितदादा पवार यांच्या अस्थी पाण्याच्या प्रवाहात सोडताना दोन्ही हात थरथर होते.
मायेची ऊब देणाऱ्या नेत्यांची अस्थी पाण्याच्या प्रवाहात वाहत असताना अनेक आठवणी सुद्धा तरंगत असल्याचा भास निर्माण झाला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर- पाटील,बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे, , सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, सीमा जाधव स्मिता देशमुख राजेंद्र लवगांरे, महिला पदाधिकारी तसेच युवा कार्यकर्ते यांच्यासह जावळी- महाबळेश्वर तालुक्यातील अनेक निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळेला अजित दादांनी केलेल्या सहकार्याबद्दल अनेक मान्यवरांनी आठवणींना उजाळा दिला.____________________फोटो- दिवंगत अजितदादा पवार यांच्या अस्थी विसर्जन करताना नेते अमितदादा कदम ( छाया- अजित जगताप ,सातारा)




