कराड(प्रताप भणगे) : हायब्रीड ३८ प्रकल्पांतर्गत पाचवड फाटा ते कोकरूड रस्ता (रा. मा. १४४), तालुका कराड या मार्गावर सध्या विद्युत पोल उभारणीचे काम सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व नियमबाह्य पद्धतीने केले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक व वाहनधारकांकडून होत आहे.
प्रत्यक्ष पाहणीत असे आढळून येते की, विद्युत पोल जमिनीत आवश्यक त्या खोलीपर्यंत व मजबूत पायाभरणीसह बसवण्याऐवजी केवळ सुमारे ३ फूट खोलीत डांब उभा करून त्यात दगड-माती टाकण्यात येत आहे. त्यावर अत्यल्प प्रमाणात सिमेंट ग्रेड वापरून, जमिनीच्या वरच्या भागात अवघ्या २ फूट काँक्रिटमध्ये पोल पॅक करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. तांत्रिकदृष्ट्या विद्युत पोल जमिनीखाली मजबूत व सुरक्षित पद्धतीने बसवणे अत्यावश्यक असताना, वरवरची व तात्पुरती कामगिरी केली जात असल्याने पोलच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या निकृष्ट कामकाजाबाबत अनेक सामाजिक संघटना, स्थानिक नागरिक तसेच वाहनधारकांनी वर्तमानपत्रे व सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र संबंधित विभागाने या तक्रारींकडे दुर्लक्ष करत कोणतीही ठोस कारवाई न करता मनमानी पद्धतीने काम सुरूच ठेवले असल्याचे चित्र आहे.
विशेषतः या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने, भविष्यात जोरदार वारा, पावसाळा किंवा किरकोळ धक्क्यामुळे हे पोल कोसळल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभाग स्वीकारणार का, असा थेट सवाल सर्वसामान्य वाहनधारक व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच तांत्रिक निकषांनुसार विद्युत पोलची पुन्हा योग्य व सुरक्षित पद्धतीने उभारणी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.




