कराड(प्रताप भणगे) : श्री निनाई देवी विद्यालय, तुळसण येथे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात एकूण ११० माता-पालक सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमात बोलताना अस्मिता पाटील म्हणाल्या की, हळदी-कुंकू व मकर संक्रांत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. महिला या नारीशक्तीचे प्रतीक असून त्यांना देवीचे स्वरूप मानले जाते. भारतीय संस्कृती आदर्श असल्याने हळद-कुंकूच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचे कार्य घडते, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक व सांस्कृतिक विभाग प्रमुख आनंदराव जानुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत खुर्ची या खेळाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात माता-पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. स्पर्धेत अर्चना विनोद वीर यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर सविता नंदेश मोहिते या उपविजेत्या ठरल्या. विजेत्यांना बक्षीस वितरण अस्मिता पाटील व माता-पालकांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंदराव जानुगडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी यांच्यासह वैभव जाधव, रघुनाथ पोतदार, जयवंत काटेकर, शिवाजी नलवडे, संजय साळुंखे, विठ्ठल काटेकर तसेच माता-पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




