अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून पक्षाचे बारा नगरसेवक निवडून आणल्यानंतरही पक्षाच्या अधिकृत भूमिकेला डावलून भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांसोबत गटबंधन केल्याचा गंभीर आरोप ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यावर करण्यात आला आहे. या गटबंधनाबाबत प्रदेश कार्यालयास कोणतीही पूर्वकल्पना न देता निर्णय घेतल्याचे प्रसारमाध्यमांतून उघड झाल्याने काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे.
ही कृती पक्षशिस्तीचा स्पष्ट भंग करणारी असल्याचे नमूद करत, मा. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार प्रदीप पाटील यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. याच निर्णयांतर्गत अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असून, संबंधित प्रकरणात पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांनाही निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे.
काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या निर्णयावरून आगामी स्थानिक राजकारणात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. पक्षसंघटन मजबूत ठेवण्यासाठी आणि शिस्तीला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी ही कारवाई केल्याचे पक्षनेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



