मुंबई : प्रसिद्ध कवी, लेखक, साहित्यिक, समाजसेवक, वास्तुविशारद, उद्योजक तसेच चित्रपट निर्माते-दिग्दर्शक डॉ. शांताराम कारंडे यांना ‘एक्सलन्स इन आर्किटेक्चरल डिझाइन पुरस्कार – २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. ओमकार प्रोडक्शन आणि भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाशी (एमएसएमई) संबंधित उपक्रमाच्या वतीने आयोजित ‘नॅशनल प्राइड अवॉर्ड – २०२६’ या पुरस्कार सोहळ्यात दिल्ली येथे त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी दिल्ली येथे झालेल्या या सोहळ्यात डायरेक्टर सुमरप्रीत कौर आणि वंदना मॅडम यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, व्यस्त दिनक्रमामुळे डॉ. कारंडे यांना सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे हा पुरस्कार कुरिअरद्वारे मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पाठविण्यात आला. त्यानंतर श्रीमती मिताली देसाई आणि सौ. प्रतिभा लोखंडे यांनी डॉ. कारंडे यांच्याकडे पुरस्कार सुपूर्द केला.
डॉ. शांताराम कारंडे हे वास्तुविशारद आणि उद्योजक म्हणून कार्यरत असून, साहित्य, सामाजिक कार्य, चित्रपटसृष्टी आणि राजकारण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. ते कवी, लेखक, संपादक, विकासक, समाजसेवक तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते म्हणूनही परिचित आहेत.
त्यांच्या साहित्यिक योगदानामध्ये शेकडो लेख, १४ कवितासंग्रह, १६ कथासंग्रह, ४ लेखसंग्रह आणि २ मराठी नाटकांचा समावेश आहे. याशिवाय चित्रपट क्षेत्रात अभिनेता, लेखक, संकलक, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. आजपर्यंत त्यांनी २६ मराठी लघुपट, १३ विविध गाणी आणि १७ मराठी नाटकांची निर्मिती केली आहे.
डॉ. कारंडे यांना मिळालेला हा २३३ वा पुरस्कार असल्याचे सांगण्यात आले. विविध क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल साहित्य, कला, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




