ताज्या बातम्या

भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा काँग्रेसकडून जाहीर निषेध करण्यात आला

कराड(प्रताप भणगे) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ कराड दक्षिण व शहर काँग्रेसच्या वतीने कराड शहरातील दत्त चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. भाजप नेत्यांनी दिवंगत आणि लोकमान्य नेत्यांविषयी केलेली बेताल वक्तव्ये राज्याच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी नाहीत, असा ठपका यावेळी आंदोलनकर्त्यांनी ठेवला.

यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी “विलासराव देशमुख अमर रहे”, “रवींद्र चव्हाण मुर्दाबाद”, “भाजपा मुर्दाबाद” अशा जोरदार घोषणा देत संताप व्यक्त केला. भाजप नेत्यांनी इतिहासातील योगदान विसरून राजकीय टीका करणे चुकीचे असून, अशा वक्तव्यांमुळे समाजात द्वेषाची भावना पसरते, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.

आंदोलनादरम्यान नामदेवराव पाटील यांनी सांगितले की, विलासराव देशमुख यांनी दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून काम करताना महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली. ग्रामीण भागाच्या विकासासाठी रस्ते, सिंचन, पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. राज्यात औद्योगिक गुंतवणूक वाढवून रोजगारनिर्मितीस प्राधान्य देण्याचे धोरण त्यांनी राबवले. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील विकासातील असमतोल दूर करण्यासाठी विशेष योजना राबवून दुर्लक्षित भागांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांनी केले.

लोकशाही मूल्ये, सामाजिक सलोखा आणि सर्वसमावेशक विकास ही विलासराव देशमुख यांची ओळख होती. सामान्य जनतेशी थेट संवाद, शांत आणि संयमी नेतृत्वशैली यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वमान्य व्यक्तिमत्त्व ठरले. अशा लोकनेत्यांविषयी अवमानकारक वक्तव्य करणे हे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या आंदोलनात कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष नामदेवराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील चिखलीकर, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. अमित जाधव, नानासो जाधव, सत्यजीत पाटील, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा वैशालीताई जाधव, उपाध्यक्षा शेवाळे मॅडम, रवि बडेकर, गोल्डन पवार, राहुल पवार, सुरेश भोसले, विजय माने, मुजीर बागवान, उमर सय्यद यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

अजितराव पाटील म्हणाले कि, लातूर मध्ये जाऊन रवींद्र चव्हाणांनी विलासरावांच्या बद्दल केलेले अवमानकारक वक्तव्य लातूरची जनता खपवून घेणार नाही. जशी कराडची ओळख पृथ्वीराज चव्हाण तशीच लातूरची ओळख विलासराव देशमुख अशी टिपणी यावेळी त्यांनी नमूद केली.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top