ताज्या बातम्या

साताऱ्यात काही मतदारांचा पाकिटातील जी.एस.टी.? कापल्याची चर्चा ..?

सातारा(अजित जगताप) : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक शांततेत पार पडली. या निवडणुकीत शिक्षक मतदार संघात मतदारांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप दस्तूर खुद्द शिवसेना शिक्षक मतदार संघातील शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप व शिक्षक पंधरा हजार रुपये घेतात. असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. तर साताऱ्यात पक्ष प्रेमी निष्ठावंत काही कार्यकर्त्यांनी मतदारांना देण्यासाठी आलेल्या पाकिटातील रकमेतून जी.एस.टी. कापण्याची चर्चा सुरू झालेली आहे. याला अद्यापही कोणी दुजोरा दिला नाही. ही अफवा असू शकते. असं दबक्या आवाजात सांगितले. याबाबत माहिती अशी की, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघांमध्ये अटीतटीची निवडणूक झाली. मोठ्या प्रमाणात शिक्षक व पदवीधर मतदार संघामध्ये उमेदवार उभे राहिले होते. प्रत्यक्षात दुरंगी व तिरंगी लढत होती. शिक्षक मतदार संघात ९४५४ मतदारांसाठी ४४ मतदान केंद्र होते व पदवीधर मतदार संघात ४७४६३ मतदारांसाठी ९३ मतदान केंद्र होते. साठी शिक्षक मतदार संघात १०८ व पदवीधर मतदार संघात ३८५ मतपेटी होत्या. लोकशाहीच्या आचारसंहितेप्रमाणे निवडणूक प्रक्रिया व्हावी. यासाठी मतदान अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली होती. अत्यंत पारदर्शकरित्या मतदान प्रक्रिया पार पाडल्याबद्दल अनेकांनी जिल्हा निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. लोकशाहीमध्ये आचारसंहितेचे पालन केल्याबद्दल प्रत्येकांना स्वतंत्र पुरस्कार द्यावा अशी मागणी केली. याचवेळी मतदारांना खुश करण्यासाठी शिक्षक मतदार संघात दहा हजार व पदवीधर मतदारांसाठी तीन हजार रुपयाची पाकीट तयार करण्यात आली होती. तसा निरोपही देण्यात आला. प्रचार यंत्रणेत सक्रिय सहभाग झालेल्या काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी व लोकांशी संपर्क असलेल्या कार्यकर्त्यांसाठी गोपनीय वाटप समिती तयार केली होती. शासन दरबारी वस्तू सेवा कर भरावा लागतो. याच धर्तीवर आपण राजकीय पक्षाचे काम करत असल्याने आपल्यालाही सेवेचा मेवा मिळाला पाहिजे. तो काहींनी रक्कम भरलेल्या बंद पाकीट मधील स्टेपलरची पिन काढून सेवा कर काढून घेतला होता. नवलाईची गोष्ट म्हणजे काहींना रिकामी पाकीटच मिळाली होती. याबाबत तक्रार केल्यास आपली बदनामी होईल. म्हणून कोणीही तक्रार केली नाही. मात्र त्याची चांगलीच चर्चा होऊ लागलेली आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रामध्ये शिक्षक व पदवीधर यांना मतदानाबाबत माहिती देण्यासाठी आठवी नापास कार्यकर्ते उत्साहाने पक्षाच्या तात्पुरत्या बुथवर बसून सक्रिय सहभाग घेत होते. काहींच्या तर शाळा सोडल्याच्या दाखल्यावर सतत गैरहजर असल्यामुळे शाळेचे नाव कमी केले आहे. असा शेरा असणारी काही मंडळी सुद्धा या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. सातारा जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघात ६७ टक्के व शिक्षक मतदार संघात ९० टक्के मतदान झाले. काल झालेल्या जिल्ह्यातील १३७ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक मतदान केंद्राला भेटी देऊन नेत्यांनी आढावा घेतला. दोन दिवसांपूर्वीच पदवीधर व शिक्षक मतदारांसाठी बंद पाकिटात लिफाफ्यात संदेश गेला होता. हा संदेश हस्ते पर हस्ते पोचवण्यासाठी यादी तयार केली होती. त्याप्रमाणे जबाबदारी देण्यात आली होती. मतदान केंद्राच्या अवतीभवती चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. लोकशाही वाचवण्यासाठी आपला हातभार लागला आहे असं त्यांच्या चेहऱ्यावर भाव होता. परंतु काहींनी तळे राखे तो पाणी चाके याची कृतीतून आठवण करून दिली. सदरच्या घटनेबाबत वरिष्ठ नेत्यांपर्यंत काही प्रामाणिक व कर्तव्यदक्ष मतदारांनी माहिती घेऊन संदेश पोहोचवला आहे. आता त्याबाबत अशा कार्यकर्त्यांना नक्कीच विचारणा होईल. यामध्ये पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा कोणताही सहभाग नाही. उलट त्यांनी पदरमोड करून या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कुणाचेही मनात शंका नाही. उलट त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने ही निवडणूक शांततेत पार पडली असा दावा केला जात आहे. परंतु काहींनी या प्रक्रियेमधून आपला दिवाळीचा हिस्सा काढून घेतल्याची चर्चा वेगाने सुरू आहे. सदर घटनेबाबत पुरावा ठेवण्याची सुताराम शक्यता नव्हती. कारण दबंग पिक्चर सारखे मुजरिम भी हम.. गवाई भी हम .. कोर्ट भी हम.. अशी सर्वांचेच युती झाली होती. त्यामुळे प्रामाणिकपणाने मतदार करणाऱ्यांना मतदान केल्यानंतर फक्त बोटावरती शाही लागल्याचे भाग्य लाभले आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणाबाबत वरिष्ठ नेत्यांनी गंभीर दखल घेतली असून लवकरच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कमी जास्त प्रमाणात झालेल्या मतदानातून काही गोष्टी स्पष्ट होणार आहेत. काहींची झाडाझडती घेतली जाणार आहे. तोपर्यंत अफवावर विश्वास ठेवायचा का नाही? हे प्रत्येकाने ठरवावे. असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Scroll to Top