मुंबई : धारावी परिसरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसताना दिसत असून, पक्षातील घराणेशाही आणि उमेदवारीतील पक्षपातामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. गेली अनेक वर्षे आई-वडिलांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून प्रत्येक आंदोलन, मोर्चा आणि पक्षकार्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
महापालिका निवडणुकीत पक्ष आपला विचार करेल आणि गरीब कुटुंबातून आलेल्या, तळागाळातील कार्यकर्त्यांना जनतेची सेवा करण्याची संधी देईल, अशी आशा अनेक पदाधिकाऱ्यांनी बाळगली होती. मात्र प्रत्यक्षात पुन्हा एकदा उमेदवारी देताना श्रीमंती आणि गायकवाड परिवाराच्या घराणेशाहीला प्राधान्य दिल्याचा आरोप नाराज कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे, पूर्वी पक्ष सोडून गेलेले, पक्षाविरोधात बोललेले आणि शिव्या-शाप दिलेले काही चेहरे पुन्हा काँग्रेसमध्ये घेऊन त्यांनाच उमेदवारी दिल्याने प्रामाणिक कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला. याच कारणामुळे काँग्रेससोबत कायम खंबीरपणे उभे राहिलेले महादेव नारायणे, मुदिलीयार यांच्यासह अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे.
मागील आठवड्यातच अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता, तर आता पुन्हा नव्याने काही कार्यकर्त्यांचा प्रवेश झाल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची धारावीतील संघटनात्मक पकड कमकुवत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या घडामोडींमुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षासाठी धारावीतील आव्हाने अधिकच वाढली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.




