मुंबई : विद्रोही लेखक व कवी श्री जयराम गणपत सोनवणे यांच्या ‘जयऱ्या’ या आत्मचरित्र पुस्तकाचे प्रकाशन दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी बांद्रे (पूर्व) येथील एम.आय.जी. क्लब सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. मान्यवर वाचक, लेखक, हितचिंतक व समाजबांधवांच्या उपस्थितीत सुशीलकुमार शिंदे (माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ‘जयजय महाराष्ट्र माझा’ या गीताने तसेच कवितावाचनाने झाली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सुशीलकुमार शिंदे यांच्यासह माँ जिजाऊंचे १४वे वंशज श्री संभाजी जाधव, दैनिक मुंबई मित्रचे संपादक अभिजीत राणे, दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री संतोष भोईर, लेखिका डॉ. चित्रा कळंबे, कवी-साहित्यिक श्री ना. म. शिंदे, ज्येष्ठ तज्ज्ञ श्री राजीव निळकंठ श्रीखंडे, लेखक-साहित्यिक श्री मोहन जाधव, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक श्री दिलीप गाडेकर, प्रमुख आयोजक श्रीराम कोकणे यांच्यासह श्री यशवंत नारायणकर, श्री राजेश खंदारे, श्री मनोहर सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुस्तक प्रकाशनप्रसंगी नामदार सुशीलकुमार शिंदे यांनी ‘जयऱ्या’ हे आत्मचरित्र दोन-तीन वेळा वाचल्याचे सांगून, त्यातील सोलापूर जिल्ह्यातील नानज गावातील जुन्या आठवणी व संदर्भांचा उल्लेख केला. साठ वर्षांपूर्वी दारिद्र्य, उपेक्षा व अशिक्षणाच्या परिस्थितीतून कष्ट करत जीवनाशी झुंज देणारा ‘जयऱ्या’ आज मुंबईसारख्या महानगरात कुटुंब सावरून समाजकारण व लेखनकार्य करत स्वतःचे आत्मचरित्र लिहितो, हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. नवलेखकांनी या जीवनप्रवासातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन करत जयराम सोनवणे यांनी आता आयुष्याचा मुक्त व स्वच्छंद आनंद घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
यानंतर श्री संभाजी जाधव यांनी पुस्तकातील आत्मचरित्र प्रामाणिकपणे मांडल्याबद्दल लेखकाचे कौतुक केले. श्री संतोष भोईर यांनी प्रस्तावनेत जयराम सोनवणे यांच्या अशिक्षित अवस्थेतून विद्रोही कवी-लेखक होण्यापर्यंतच्या प्रवासाचा गौरव केला. अभिजीत राणे यांनी पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त केले, तर डॉ. चित्रा कळंबे यांनी “अशिक्षित माणसाने ज्ञानशक्ती सरस्वतीला आपल्याकडे खेचून आणले” असे गौरवोद्गार काढले. श्री दिलीप गाडेकर यांनी जयराम सोनवणे व त्यांच्या कुटुंबाविषयी कृतज्ञता व्यक्त करत, यापूर्वीच्या दोन कवितासंग्रहांप्रमाणेच या आत्मचरित्रामागे मित्रपरिवार व हितचिंतकांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात साधू कटके, शंकर बळी, शशिकांत सोनवणे, अरुणोदय वॉकर्स असोसिएट, बांद्रा मॉर्निंग वॉकर्स ग्रुप (धारावी) यांचे योगदान मोलाचे ठरले. कार्यक्रमाच्या शेवटी लेखक जयराम सोनवणे व त्यांच्या कुटुंबीयांचा नामदार सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सूरज संतोष भोईर यांनी केले.




