कराड(प्रताप भणगे) : श्री शिवाजी विद्यालय, मसूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन तसेच वार्षिक विविध स्पर्धांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा स्नेहसंमेलनांचे आयोजन अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन मानसिंगराव जगदाळे (माजी शिक्षण व अर्थ सभापती) यांनी आपल्या भाषणात केले.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते किशोर काळोखे, सुधाकर रामुगडे, आदरणीय पी. डी. पाटील (संचालक, सहकारी बँक), भीमराव इंगवले (चेअरमन, रिसवड–अंतवडी सोसायटी), शालन देशमाने, मुख्याध्यापक शिवाजी पवार, रतन फडतरे (श्री कॉम्प्युटर), संदीप पारवे, सचिन जगदाळे (अध्यक्ष, शिक्षक-पालक संघ), निखिल भाट, ऐश्वर्या जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे किशोर काळोखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवणे, व्यसनांपासून दूर राहणे आणि पुस्तकांच्या सहवासात राहून सातत्याने ज्ञानसंपादन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, नाट्य अशा विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच वार्षिक स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत माने यांनी केले, तर आभारप्रदर्शन अमित काटवटे यांनी केले.




