मुंबई : मुंबई महापालिकेवर तब्बल तीन वर्षे नऊ महिने प्रशासक राजवट होती. या काळात मुंबईकरांचे लोकप्रतिनिधी नव्हते आणि प्रशासकांच्या माध्यमातून मुंबईकरांची लूट झाली, असा आरोप करत मुंबई काँग्रेसने महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, प्रशासक राजवटीत नेमके कोणते काम झाले, याचा पुराव्यानिशी आरोपपत्र आम्ही घेऊन आलो आहोत. रस्त्यांची दुरवस्था, वाढती ट्रॅफिक कोंडी, हवेचे प्रदूषण, सर्वत्र पडलेले खड्डे या गंभीर प्रश्नांवर मुंबई काँग्रेसने सातत्याने आवाज उठवला आहे. देशाच्या आर्थिक राजधानीची अशी वाताहात करून मुंबईकरांवर अन्याय करण्यात आला, हे आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.
यावेळी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लवकरच मुंबई काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. येणारी मुंबई महापालिका निवडणूक ही जात, धर्म, प्रांत किंवा भाषेच्या विवादावर नव्हे, तर मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नांवरच झाली पाहिजे. मुंबईकरांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले पाहिजे, हा मुंबई काँग्रेसचा ठाम निर्धार आहे.
या पत्रकार परिषदेला आमदार भाई जगताप, डॉ. ज्योती गायकवाड यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




