नवी मुंबई : मा. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी दि. 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. यामध्ये आयोगामार्फत दिलेल्या 45588 संभाव्य दुबार मतदारांच्या यादीची बीएलओमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली असून त्यामध्ये 13336 दुबार मतदार आढळून आले आहेत. त्यांच्याकडून ते कोणत्या प्रभागातील मतदार यादीत समाविष्ट असलेल्या नावावर मतदान करणार याचे विकल्प स्वरुपातील हमीपत्र भरुन घेण्यात आले आहे.
महापालिका क्षेत्रात मा. राज्य निवडणूक आयोग यांच्या वतीने प्राप्त दुबार मतदारांच्या यादीनुसार तपासणी करण्यासाठी प्रभागनिहाय बीएलओ यांची पथके स्थापन करण्यात आली होती. दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार संगणक प्रणालीव्दारे दुबार मतदारांच्या नावानुसार व विधानसभा यादी भागाप्रमाणे मतदार यादीचे वर्गीकरण करण्यात आले व छायाचित्रे असलेली दुबार मतदारांची यादी बीएलओ यांच्याकडे पडताळणीसाठी देण्यात आली होती.
बीएलओ मार्फत मतदार यादीतील या संभाव्य दुबार नावांचा शोध घेऊन, फोटो पडताळणी करुन, ही नावे काणत्या प्रभागात आहेत, छायाचित्रात साम्य आहे काय, आई वडीलांच्या नावात साम्य आहे काय, पत्ता सारखा आहे काय – अशा विविध प्रकारे तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकाच व्यक्तीचे नाव दोन पत्त्यांवर आढळल्यास अशी दुबार नाव असलेली व्यक्ती त्यापैकी कुठल्या पत्त्यावर असलेल्या नावांवर मतदान करेल याबाबत विकल्प अर्थात हमी पत्र भरुन घेण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने मा. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या संभाव्य दुबार मतदारांची पडताळणी नियोजनबध्दरित्या केली आहे




