नवी मुंबई : मातृत्वालाच काळीमा फासणारी धक्कादायक घटना कळंबोली परिसरात उघडकीस आली आहे. एका महिलेने आपल्याच सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलीची निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. सुप्रिया प्रमोद म्हामुणकर (३०) असे आरोपी महिलेचे नाव असून, कळंबोली पोलिसांनी तिला अटक केली आहे.
सुप्रिया म्हामुणकर ही कळंबोली सेक्टर-१ ई येथील गुरू संकल्प सोसायटीत पती प्रमोद आणि सहा वर्षीय मुलगी मानसी हिच्यासह राहत होती. मानसी इयत्ता पहिलीत शिक्षण घेत होती. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुप्रियाला मुलगा हवा होता. त्यामुळे मानसीच्या जन्मानंतरपासून ती तिच्याकडे दुर्लक्ष करत होती आणि तिला नकोशी मानत होती. मुलगी नीट बोलत नाही, कायम हिंदीत बोलते, अशा तक्रारी ती वारंवार पतीसमोर करत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. यापूर्वीही सुप्रियाने मानसीला मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
२३ डिसेंबर रोजी सायंकाळी प्रमोद म्हामुणकर हे स्वामी समर्थांच्या बैठकीसाठी घराबाहेर गेले होते. दरम्यान, मानसी नेहमीप्रमाणे खासगी ट्युशनला गेली होती. याचवेळी सुप्रियाने मानसीला ट्युशनमधून लवकर घरी बोलावून घेतले. घरी आल्यानंतर सुप्रियाने मानसीचे नाक व तोंड दाबून तिची हत्या केली. त्यानंतर ती मृत मानसीच्या शेजारीच झोपून राहिली.
या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, कळंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत.



