शांत, संयमी, सुसंस्कृत अशी ओळख असलेल्या नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मुत्सद्देगिरीची चुणूक नुकत्याच झालेल्या नगर पालिका व नगर पंचायतींच्या निवडणूकीत सर्वांनाच आली असेल. सातारा नगर पालिका निवडणुकीचा आजवरचा इतिहास पाहिला तर, ना. शिवेंद्रराजे आणि खा. उदयनराजे या दोन्ही भावांमध्येच अटीतटीचा ‘सामना’ रंगत असे! यंदाच्या निवडणूकीचे चित्र फार वेगळे होते. दोन्ही राजे भाजपमध्ये असल्याने ‘कमळ’ चिन्हावर दोघांना ही निवडणूक एकत्रपणे लढणे बंधनकारक होते. उमेदवारीच्या ‘वाटाघाटी’ नंतर प्रत्यक्ष निवडणूक लागली त्यावेळी लढतीचा ‘न भूतो न भविष्यती’ असा गिचमिड काला झाला होता. दोन्ही राजांनी एकत्रीत प्रचारात उतरणे अपेक्षित असताना खा. उदयनराजेंना प्रकृती अस्वास्थ्यामुळे (?) निवडणूक प्रचारात उतरता आले नाही. त्यामुळे विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या खऱ्या पण, ना. शिवेंद्रराजे नावाच्या झंझावाती वादळापुढे विरोधकांचा अक्षरशः पालापाचोळा झाला!
सातारा नगर पालिकेचा आजवरचा इतिहास पाहता प्रत्येक निवडणूक चुरशीची झाली आहे. खा. उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडी आणि ना. शिवेंद्रराजे भोसले यांची नगर विकास आघाडी यांच्यात कडवी झुंज नेहमीच पाहायला मिळत असे. यंदाची निवडणूक मात्र वेगळी होती. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यात ना. शिवेंद्रराजे हे भाजपचे आमदार आणि भाजपच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री, तसेच खा. उदयनराजे हे देखील भाजपचे खासदार आहेत. ना. शिवेंद्रराजे मंत्री असल्याने त्यांच्यावर सातारा जिल्ह्यातील नगर पालिका व नगर पंचायतींसाठी निवडणूक प्रमुख ही जबाबदारी पक्षाने सोपवली होती. सहाजिकच सातारा नगर पालिकेत आघाडी नव्हे तर पक्ष म्हणून निवडणूक लढवणे दोन्ही राजांना भाग पडले. त्यामुळे पारंपरिक राजकीय ‘युद्ध’ बाजूला ठेवून दोघांनाही पक्षाच्या चिन्हाखाली निवडणूक लढवावी लागली. दोन्ही राजांचे सातारा नगर पालिकेतील आजवरचे वितुष्ट लक्षात घेऊनच विरोधी महाविकास आघाडीने आधीपासूनच व्युव्हरचना करण्यास सुरुवात केली होती.
भाजपच्या ‘छताखाली’ निवडणूक लढवताना नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या उमेदवारीवरून दोन्ही राजांमध्ये बरेच ‘घमासान’ झाले. ना. शिवेंद्रराजे यांची वाढलेली राजकीय ताकद आणि वलय पाहता काहीही झाले तरी नगराध्यक्ष पद हे त्यांच्या गटाकडेच जाणार होते. दोन्ही राजे गटांकडून अनेक नावे चर्चेत असताना अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम ठेवण्यात आला होता. नगरसेवक पदाच्या उमेदवार निवडीवरूनही बरेच ‘रणकंदन’ झाले होते. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच दोन्ही गटाचे म्हणजेच भाजपचे उमेदवार ‘फायनल’ झाले. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक अमोल मोहिते यांना उमेदवारी देण्यात आली. इकडे राष्ट्रवादीचे नेते आ. शशिकांत शिंदे यांनी भाजपमधून अचानक राष्ट्रवादी (श.प.) मध्ये दाखल झालेल्या सुवर्णा पाटील यांना नगराध्यक्ष पदासाठी उभे केले.
उमेदवार निश्चित झाल्यानंतर भाजपच्या प्रचाराचा झंजावात सुरु झाला तो ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळे! प्रचाराच्या प्रारंभापासूनच ना. शिवेंद्रसिंहराजे मैदानात उतरले होते तर, खा. उदयनराजे हे प्रचारापासून अलिप्त राहिल्याचे दिसले. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते प्रचारासाठी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत होते. ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मात्र पायाला भिंगरी बांधून प्रचाराची सगळी सूत्रे हातात घेतली. सकाळी पदयात्रा, दुपारी भेटीगाठी यासह सायंकाळी कोपरा सभा असा निश्चित प्रचार कार्यक्रम त्यांनी राबवला. भाजपच्या प्रत्येक उमेदवाराच्या मग तो आपल्या गटाचा आहे का उदयनराजे गटाचा आहे, याचा विचार न करता ना. शिवेंद्रराजे शहरातील प्रत्येक प्रभागात, गल्लीबोळात फिरले. गट- तट असा भेदभाव न करता त्यांनी भाजपकडून अधिकृत असलेल्या प्रत्येक उमेदवाराचा प्रचार केला. ना. शिवेंद्रराजे स्वतः मतदारांच्या गाठीभेटी घेऊन भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करत होते. घरात मुलीचे लग्नकार्य असतानाही ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी संपूर्ण लक्ष निवडणुकीकडे केंद्रित केले होते, यावरून ही निवडणूक ना. शिवेंद्रराजे आणि भाजपसाठी किती महत्वाची होती याचा प्रत्यय येतो.
खा. उदयनराजे प्रचारात कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. त्याकडे लक्ष न देता ना. शिवेंद्रराजे यांनी भाजपच्या प्रत्येक उमेदवारासाठी स्वतःला झोकून देऊन प्रचार यंत्रणा राबवली. अनेक प्रभागात अपक्ष उमेदवारांना विरोधी गटाकडून ‘रसद’ पुरवली गेल्याची चर्चा रंगली. तेथेही ना. शिवेंद्रराजेंनी त्या-त्या प्रभागातील प्रमुख कार्यकर्ते, नागरिक याना स्वतः भेटून, फोन करून काहीही झाले तरी भाजपच्याच उमेदवाराचे काम करायचे आहे, असे बजावले. अनेक अपक्ष उमेदवार हे खा. उदयनराजेंच्या गोटातील होते, त्यामुळे त्यांची मनधरणी खा. उदयनराजे यांनी करणे अपेक्षित होते पण, तसे झाले नाही. त्याचा फायदा विरोधकांनी घेतला आणि त्यामुळे निवडणुकीला रंगत आली होती. परिस्थिती बिकट झाली होती, मात्र ना. शिवेंद्रराजेंनी काहीही झाले तरी सातारा पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवायचा हे ध्येय निश्चित केले होते. ना. शिवेंद्रराजेंच्या झंझावाती प्रचारामुळे आणि मुख्य म्हणजे त्यांचे वाढलेले राजकीय, सामाजिक वजन किंवा वलय म्हणा, यामुळे भाजपचा विजय निश्चित मानला जात होता. औपचारिकता होती ती निकालाची! निकाल जवळ आल्यानंतर अनेक अटकळी बांधल्या गेल्या पण, निकालानंतर ना. शिवेंद्रराजेंच्या वादळात विरोधकांचा सुपडासाफ झाल्याचे स्पष्ट झाले.
भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते तब्बल ४२ हजार पेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून आले, हे राज्यातील १ नंबरचे मताधिक्य आहे तर, ५० नगरसेवक पदापैकी एकट्या भाजपचे तब्ब्ल ४० नगरसेवक निवडून आले असून सातारा पालिकेवर पहिल्यांदाच भाजपची निर्विवाद सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले, हे फक्त आणि फक्त ना. शिवेंद्रराजेंच्या झंजावातामुळेच शक्य झाले आहे. उर्वरित १० मध्ये ९ अपक्ष तर १ शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा नगरसेवक निवडून आला आहे. ९ अपक्ष उमेदवार निवडून आले त्याला प्रमुख कारण म्हणजे त्या- त्या प्रभागातील आपापसातील मतभेद आणि गटतट हेच आहे. निवडून आलेले सर्वच अपक्ष हे भाजप म्हणजेच दोन्ही राजेंचेच समर्थक आहेत. त्यामुळे फक्त एकच नगरसेवक अन्य पक्षाचा निवडून आला असून प्रमुख विरोधक असलेल्या महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी (श.प.) पक्षाला साताऱ्यात भोपळाही फोडता आला नाही. अपक्षांच्या आकडेवारीची गोळाबेरीज केली असता भाजपने नगराध्यक्ष पदासह ५० पैकी तब्बल ४९ जागा जिंकल्या असेच म्हणावे लागेल. निवडणूक झाल्यावर ‘आधे इधर आधे उधर’ हे होणारच! त्यामुळे हा विजय केवळ एकट्या भाजपचा नव्हे तर, पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या, रात्रंदिवस विजयासाठी धावणाऱ्या नेतृत्वाचा, नामदार शिवेंद्रराजे भोसले यांचा आहे, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असून ती पुसली जाणार नाही, हे निश्चित!
अमर मोकाशी (पत्रकार)]
मो. 073500 10303




