कराड(अमोल पाटील) : उंडाळे (ता. कराड) येथील कन्या वैशाली निलेश माने यांनी रहिमतपूर (जि. सातारा) नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षा म्हणून निवडून येत माहेरच्या गावाचा नावलौकिक वाढवला आहे. त्यांच्या या यशामुळे उंडाळे गावात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वैशाली माने यांचे माहेर उंडाळे येथील सुशिक्षित व सुसंस्कृत कुटुंबात आहे. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते, तर आई गृहिणी असून संस्कारक्षम कुटुंबव्यवस्थेची पायाभरणी त्यांनी केली. वैशाली यांना दोन बहिणी असून धाकटी बहीण पल्लवी ही सासरच्याच घरात दिलेली आहे. पल्लवी सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. तसेच वैशाली यांचा भाऊ अतुल पाटील हा ONGC मध्ये डेप्युटी मॅनेजर पदावर कार्यरत असून कुटुंबाची शैक्षणिक व सामाजिक परंपरा अधोरेखित करतो.
उंडाळेच्या संस्कारातून घडलेल्या वैशाली माने यांनी रहिमतपूरमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या मनमिळाऊ स्वभावाने, संयमी नेतृत्वाने आणि सर्वसामान्यांशी असलेल्या आपुलकीच्या नात्यामुळे अल्पावधीतच लोकांचा विश्वास संपादन केला. त्यांचे पती निलेश माने यांनी त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष संपतराव माने यांच्या राजकीय वारशाला पुढे नेत लोकाभिमुख कामातून जनाधार वाढवला.
नगराध्यक्षा म्हणून वैशाली माने आणि नगरसेवक म्हणून निलेश माने यांची निवड ही केवळ राजकीय यश नसून, ती एका सुशिक्षित कुटुंबातून आलेल्या लेकीच्या नेतृत्वक्षमतेची पावती असल्याची भावना उंडाळे परिसरात व्यक्त होत आहे.
या विजयाने जयकुमार गोरे आणि मनोज घोरपडे यांनी दाखवलेला विश्वासही सार्थ ठरला असून, रहिमतपूरच्या विकासासाठी माने दाम्पत्य नवे पर्व सुरू करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
उंडाळेच्या लेकीने नगराध्यक्षा पदापर्यंत मजल मारल्याने परिसरातील तरुणींसाठी हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.




