कराड(अमोल पाटील) : कराड, पाटण आणि शिराळा तालुक्यातील जनतेने चाळीस दिवस बेमुदत आंदोलन करून शासनाला १ कोटी ६५ लाख ४५ हजार रुपयांची मंजुरी देऊन १०५ गावातील शेतीला पाणी देण्यासाठी सर्व्हे करण्यास आदेश दिला होता. काही गावांचा सर्व्हे झाला. दरम्यानच्या काळात दिवाळी आल्यामुळे सर्व्हे थांबला. परंतु दिवाळी होऊन काही महिने उलटून गेले तरी राहिलेल्या गावांचा सर्व्हे झाला नाही, म्हणून श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांनी सर्व्हे करण्याची एजन्सी, संबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला, परंतु ठोस उत्तर मिळत नव्हते.
काही संबंधित लोक सर्व्हे पूर्ण झाला आहे असे सांगत होते, तर संबंधित लोक जेवढ्या क्षेत्राला पाणी उपलब्ध होऊ शकते तेवढ्या क्षेत्राचा सर्व्हे झाला आहे, असे सांगितले जात होते. यामुळे या १०५ गावातील आणि ज्या गावात सर्व्हे झाला नाही, त्या जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता.
यामुळे या शिराळा, कराड व पाटण तालुक्यातील जनतेने ३० नोव्हेंबर २०२५ रोजी घोगाव ता. कराड येथे मेळावा घेऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या तारखा सुद्धा जाहीर केल्या होत्या.
त्याचा परिणाम म्हणून पाटबंधारे विभागाने व संबंधित सर्व्हे करणाऱ्या एजन्सीने दखल घेऊन उर्वरित सर्व गावांचा सर्व्हे पूर्ण केला असून या श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे..
———————————————–




