मुंबई – बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रितू तावडे व उप महापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची निवड झाली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
महापौर, उपमहापौर व सर्व पदाधिकारी या महापालिकेला दिशा देतील व सामान्य मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करतील. त्यांना पूर्ण ताकद देण्याचे काम आम्ही करू. त्यांच्या माध्यमातून नवीन मुंबई घडविण्याच्या कामाला गती देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात महापौर व उपमहापौर निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी बोलत होते. यावेळी मुंबई शहराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी खासदार राहूल शेवाळे, आमदार अमित साटम, प्रविण दरेकर, चित्रा वाघ, आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रितू तावडे यांच्याकडे एक अनुभवी व अस्सल मराठी चेहरा म्हणून पाहिले जाते. त्यांनी यापूर्वीही मुंबईकरांच्या प्रश्नांकरिता आक्रमक भूमिका घेतली आहे. यापुढेही त्यांच्या माध्यमातून महायुती सरकारने सुरू केलेला मुंबईच्या विकासाचा कार्यक्रम महापालिकेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने राबविला जाईल. उपमहापौर संजय घाडी यांच्या अनुभवाचा फायदा महापालिकेला मिळेल. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित अशा प्रकारचे प्रशासन महापालिकेच्या माध्यमातून चालविले जाईल.
महानगरपालिका ही लोकशाहीचे अंग आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तेथे प्रशासक होते. तेथे लोकप्रतिनिधींचे लोकशाहीला अपेक्षित राज्य प्रस्थापित झाले याचा मला आनंद आहे. जनसामान्यांना आपले लोकप्रतिनिधी अधिक जवळचे वाटतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या सभागृहाच्या गॅलरीत मी पहिल्यांदाच बसलो. अशा प्रकारे मी पहिल्यांदाच सभागृहाचे कामकाज पाहिले आहे. अशा ऐतिहासिक व वारसा असलेल्या वास्तूमध्ये महत्त्वाच्या सोहळ्याचे साक्षीदार होणे हे महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अतिशय कार्यक्षम महापौर व उपमहापौर मिळाले आहेत. गेल्या साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालना दिली. त्या कामाची पोचपावती मुंबईकरांनी दिली. विकासाला प्राधान्य व विकासाला मुंबईकरांनी स्वीकारले आहे. मुंबई जागतिक दर्जाचे शहर करण्याची भूमिका आहे. मुंबई शहरासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करण्याचे काम आम्ही करू. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सरकार करणार. त्यांचे झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. मुंबई खड्डेमुक्त रस्ते, प्रदूषणमुक्त करण्याची आमची भूमिका आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईला फिनटेक कॅपिटल करण्याचे स्वप्न पाहिले आहे, ते पूर्ण करण्याचे काम शासन करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले




