“कलाश्रम

‘ या संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्याला ‘अभियान सन्मान’ हा उपक्रम राबवला जातो. मंगळवार ३० डिसेंबर सायंकाळी ४ वाजता. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, चौथा मजला येथे होणारे हे ७२ वे पुष्प आहे. डिसेंबर महिन्यात दिवंगत झालेल्या प्रज्ञावंतांचे स्मरण आणि तसे कार्य करणाऱ्या गुणीजनांना ‘दखलपत्र’ देऊन त्यांचा सन्मान करणारा हा उपक्रम असतो. ही संस्था स्वातंत्र्यसैनिक डॉ. पशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत कार्य करते. अभिनेते, दिग्दर्शक मिलिंद गवळी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यात प्रामुख्याने लेखक, साहित्यिक आदिनाथ हरवंदे, अभिनेते राजशेखर, आदर्श गृहिणी वैजयंता डाळे, आदर्श श्रमिक पांडुरंग परब, आदर्श गृहिणी रुक्मिणी परब यांचे स्मरण होणार आहे. यांच्या नावाचे ‘दखलपत्र’ लेखक संजीव पाध्ये, अभिनेते विजय निकम, आदर्श गृहिणी चंद्रकला वास्कर, कामगार सुपुत्र ढोलकीसम्राट ज्ञानेश्वर ढोरे यांना दिले जाणार आहेत. हेच निमित्त घेऊन प्रत्येक महिन्याला महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या प्रज्ञावंतांना प्रत्यक्ष कलाकृती सादर करून आदरांजली वाहिली जाते. डिसेंबर महिन्यातील स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन अभिनेते रवी पटवर्धन यांना ‘शब्दांजली’ वाहिली जाणार आहे. त्यासाठी गप्पागोष्टीचे सादरकर्ते जयंत ओक हे येणार आहेत. प्रत्येक महिन्याला अभिनव स्पर्धा घेण्यात येते. यंदा सुद्धा ६६ वी स्पर्धा ‘सरले वर्ष, कोणी वेधले लक्ष’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा सामाजिक कार्यकर्ते, वादक कलाकार चंद्रकांत चव्हाण यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने घेण्यात आली होती. त्यांचे चिरंजीव अभिनेते, दिग्दर्शक संजीव चव्हाण यांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले होते. ज्येष्ठ पत्रकार सुरेंद्र गांगण यांनी स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले. सानिका पाटील, आदित्य धायगुडे, ऋचा हर्डीकर, रवींद्र आटे, सुजाता गोलतकर, हेमांगीनी दळवी, मृग्मयी मोडक सलोनी बोरकर आदींचा या कार्यक्रमामध्ये सहभाग असणार आहे. विशाल यादव हे संस्थेचे सन्माननीय सदस्य आहेत. ‘घुसमट’ आकांत अंतर्गत वादळाचा हे त्यांचे स्वअनुभवावरती लिहिलेले पुस्तक आहे. त्याचे प्रकाशन या सोहळ्यात होणार आहे. पत्रकार नंदकुमार पाटील हे या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आहेत. नंदिनी पाटील या संचालिका आहे.




